Investment planning | संपत्ती निर्मिती आणि निष्क्रिय उत्पन्नाचा ‘ब्लूप्रिंट प्लॅन’

Investment planning |
Investment planning | संपत्ती निर्मिती आणि निष्क्रिय उत्पन्नाचा ‘ब्लूप्रिंट प्लॅन’
Published on
Updated on

अनिल पाटील, प्रवर्तक : एस. पी. वेल्थ, एमएफडी प्रा. लि.

आपल्यापैकी ९०% लोकांची ‘महिना संपण्यापूर्वी पैसे संपणारी’ लाखो कुटुंबे अवतीभोवती पहावयास मिळतात. याचे कारण यातील कुटुंब प्रमुखाला निष्क्रिय उत्पन्नाचे महत्त्व माहीतच नाही, हे सत्य आहे. मुळात तुम्ही झोपलेले असतानाही तुमच्या बँक खात्यात पैसे सतत येत राहिले पाहिजेत. यासाठी संपत्ती निर्मितीमधून निष्क्रिय उत्पन्न याचे आर्थिक गणित आपण समजून घेणे गरजेचे आहे.

बरेचजण दिवसातील १० ते १२ तास काम करून पैसे कमवितात; पण २० तारखेपर्यंत तो पगार संपतो. त्यांच्यासाठी उरलेले १० दिवस पुढच्या पगारासाठी आर्थिक ताणाचे ठरतात. पैशासाठी अहोरात्र काम करणारे ते, मिळणाऱ्या पैशाचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरल्याने शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी फक्त कामच करत राहणे नशिबात येते. पैशासाठी काम करणे आणि पैशाला कामाला लावणे या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आलेल्या उत्पन्नातून योग्यवेळी गुंतवणुकीद्वारे तो पैशाने पैसा कसा जोडायचा? पैशाला कसे काम लावून त्याच्यापासून पैशाचा प्रवाह निर्माण करायचा आणि स्वच्छंदी आनंदी आर्थिक स्वातंत्र्यामध्ये जगायचे, ‘हा’ खास फॉर्म्युला अंमलात आणता आला पाहिजे.

आजच्या काळात महागाई मोठ्या गतीने वाढत आहे. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढत आहेत. परिणामी, खर्च मोठा आणि उत्पन्न कमी अशी अवस्था दिसत आहे. केवळ एका नोकरीच्या पगारावर संपूर्ण कुटुंबाचा खर्च भागवणे आणि भविष्यासाठी मोठी बचत करणे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी कठीण होत चालले आहे. जर काही कारणास्तव नोकरी गेली किंवा तुम्ही आजारी पडलात, तर काय? याचा प्रामुख्याने विचार करायला हवा. म्हणूनच स्वतःसाठी ‘ॲसेटस्‌’ (Assets-संपत्तीचे मार्ग) निर्माण करण्यासाठी प्राधान्याने विचार करायला हवा.यासाठी वारेन बफेटचा नियम विचारात घेतला पाहिजे. कुटुंबात एका ठिकाणाहून १०० रु. येण्यापेक्षा १०० ठिकाणांहून एक एक रुपया आला पाहिजे. एका ठिकाणाहून येणारा १०० रु. चा मार्ग बंद झाला तर ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ शकते. म्हणून कुटुंबात अनेक मार्गांनी पैसा आला पाहिजे आणि भविष्यासाठी असेल ॲसेट बिल्डिंगचा ब्लूप्रिंट (Step-by-Step Plan) तुम्ही अंमलात आणला पाहिजे.

ॲसेट म्हणजे नक्की काय?

साध्या भाषेत सांगायचे तर तुम्ही तुमच्या खिशातून पैसे खर्च करता तेव्हा तो खर्च मत्ता (Asset) ॲसेटवर होत असतो किंवा दायित्ववर (Liabilities) होत असतो, हे लक्षात घ्या. आयुष्याच्या वाटेवर भविष्याकडे जाताना विचार करून पैसा खर्च करा. हा जास्तीत जास्त ॲसेटवर खर्च झाला पाहिजे, याची दक्षता घ्या. यामुळे जास्तीत जास्त ॲसेट गोळा होतील आणि भविष्यही उज्ज्वल होईल.

मत्ता (Asset) : जी गोष्ट तुमच्या खिशात पैसे टाकते (उदा. भाड्याने दिलेली जागा, कंपनी शेअर्स, व्यवसायातील गुंतवणूक, म्युच्युअल फंड, बँक एफडी, वगैरे). इथे टाकलेला पैसा काही ना काही स्वरूपात उत्पन्न निर्माण करतो. सांपत्तिक स्थिती मजबूत करतो. हा मार्ग खऱ्या अर्थाने श्रीमंतीकडे जातो.

दायित्व (Liability) : जी गोष्ट तुमच्या खिशातून पैसे काढून घेते (उदा. कर्जावर घेतलेली महागडी कार, क्रेडिट कार्डचे बिल, होम लोन, राहत्या घरावर मोठा खर्च करणे इ.). या ठिकाणी खर्च झालेला पैसा हा परत येत नाही. हा मार्ग गरिबीकडे जातो.

मध्यमवर्गीय कुटुंब म्हणून जर आपल्याला श्रीमंत आणि चिंतामुक्त व्हायचे असेल, तर दायित्व (Liabilities)वर खर्च कमी करून जास्तीत जास्त मत्ता (Asset) तयार करण्यावर भर द्यायला हवा. ॲसेट गोळा करण्यासाठी भरपूर पैसा खर्च करावा लागत नसून त्यात १०० रु. पासून कितीही गुंतवणूक करू शकता. फक्त या ठिकाणी सातत्य हवे आणि दीर्घकाळ गुंतवणूक हवी.

मध्यमवर्गीयांसाठी ॲसेट बिल्डिंगचा ब्लूप्रिंट (Step-by-Step Plan)

पहिली पायरी (कमाई वाढवा) : तुमच्या मुख्य नोकरीसोबतच एखादे नवीन कौशल्य शिकून अतिरिक्त कमाईचे साधन शोधा किंवा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न निर्माण करा.

दुसरी पायरी (खर्चावर नियंत्रण) : कुटुंबातील सदस्यांची गरज आणि इच्छा यातील फरक ओळखा. फक्त गरजेवरच खर्च करा, इच्छेला बाजूला सारा. दिखाव्यासाठी किंवा दुसऱ्याला दाखवण्यासाठी महागडे मोबाईल, वाहने, कपडे, इ. गोष्टींत काटकसर करा. वारंवार कर्जावर वस्तू घेणे टाळा.

तिसरी पायरी : कुटुंबात पैसा किती येतो, खर्च किती होतो, शिल्लक किती राहतो, याचे दरमहा बजेट तयार करा. आवश्यक गोष्टींवर खर्च करा. अनावश्यक गोष्टींचा खर्च टाळा. काटकसर करायची सवय ठेवा. काटकसर करून पैसे वाचविणे म्हणजे संपत्ती निर्माण करणे होय.

चौथी पायरी : बचत नव्हे, सातत्याने गुंतवणूक करा : जर तुमच्याकडे १०० रु. येत असतील तर ४० रु. कुटुंबाच्या खर्चासाठी वापरा. कर्जाचा हप्ता ४०% पेक्षा जास्त नसावा. किमान २५ ते ३०% तुमचे पैसे शिल्लक ठेवा. पैसे फक्त बचत खात्यात पडून न ठेवता त्याला कामाला लावा. त्याची इक्विटी म्युच्युअल फंडात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. इक्विटी म्युच्युअल फंडात बाजाराची जोखीम असते ती मात्र समजावून घ्या. दरमहा येणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी २५ ते ३०% गुंतवणूक करा.

पाचवी पायरी : पैसा वाढण्यास वेळ द्या (संयम ठेवा) : संपत्ती एका रात्रीत बनत नाही. मोठ्या संपत्तीसाठी मोठा वेळ हवा. प्रत्येक वर्षी व्याजावर व्याज वाढत जाते. या चक्रवाढ व्याजाची जादू दिसण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीला किमान १० ते १५ वर्षांचा वेळ द्या. प्रतिवर्षी सातत्याने गुंतवणूक सुरू ठेवलीच पाहिजे. शक्य असेल तर उत्पन्न जसे वाढते तशी गुंतवणूक वाढविली पाहिजे. दीर्घकाळात गुंतवणूक वाढवीत गेले तर संपत्ती कशी निर्माण होऊ शकते. त्याचे थोडक्यात उदाहरण दिले आहे.

उदा. संजयचे वय २५ वर्षे आहे. त्यांनी दर महिन्याला १०,०००/- रु.

डायव्हर्सीफाईड इक्विटी म्युच्युअल फंडात नियमितपणे दरमहा गुंतवणूक (सीप) सुरू केली. वर्षाला वाढणाऱ्या उत्पन्नातून प्रतिवर्षी ५% नी गुंतवणूक वाढवीत राहिले. १५ वर्षांत मागील इतिहासानुसार सरासरी १२% दराने परतावा गृहीत धरला, तर वयाच्या ४० व्या वर्षी पंधरा वर्षांनंतर ६२ लाखांची संपत्ती तयार होते. ६२ लाख रुपये विविध मालमत्तेमध्ये (Asset Allocation) द्वारे वेगवेगळ्या बकेट प्लानिंग पोर्ट फ़ोलिओ तयार करून संजयला ४१ वर्षांनंतर दर महिन्याला ३५०००/- एस डब्लू पी माध्यमातून उत्पन्न सुरू करता येते. प्रतिवर्षी ४,२०,०००/- प्रमाणे दहा वर्षांत ४२ लाख तो घेऊ शकतो. हा पोर्ट फ़ोलिओ ९% दराने पैसा वाढविला असता संजयच्या ५०व्या वर्षांनंतर ८० लाख शिल्लक राहू शकतात. ५१ वर्षांनंतर परत दरमहा ४५०००/- प्रमाणे वर्षाला ५,४०,०००/- उत्पन्न निर्माण करता येते. दहा वर्षांत ५४ लाख उत्पन्न घेऊन संजयच्या साठाव्यावर्षी हा पोर्ट फ़ोलिओ ९% ने वाढविला असता दहा वर्षांनंतर १ कोटी संपत्ती तयार होते. एकसष्टी नंतर दर महिन्याला ५०,००० /- उत्पन्न सुरू करता येते. अशी कोटीच्या घरात संपत्ती निर्माण होते. अशा प्रकारे तहहयात दरमहा उत्पन्न घेऊ शकतो. मात्र, संजयने योग्यवेळी गुंतवणूक करण्यास महत्त्व दिले पाहिजे. थोडक्यात, पगारातून फक्त तुमचे आजचे रोजचे खर्च चालतात, त्याच पगारातून काटकसरीने सातत्याने गुंतवणूक करत राहिले तरच चांगली संपत्ती निर्माण होते. ही ‘ॲसेटस्‌’ तुम्ही झोपलेले असतानाही तुमच्या खात्यात पैसे आणून देते. तुमच्या दररोजच्या कामाच्या गुलामगिरीतून तुम्हाला मुक्त करते आणि आर्थिक स्थैर्य देते.

डिव्हिडंड देणारे शेअर्स (नियमित उत्पन्न)

शेअर बाजारातील काही मजबूत कंपन्या त्यांच्या नफ्यातील काही हिस्सा नियमितपणे आपल्या शेअरधारकांना वाटतात, याला लाभांश (Dividend) म्हणतात. याचा फायदा असा होतो - प्रति वर्षी तुमचे उत्पन्न वाढते आणि तुमच्या खात्यात शेअर्स असतात, त्यांचे मूल्यही वाढते. दर महिन्याला चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आपल्या पोर्ट फ़ोलिओमध्ये वाढवत चला. ठरावीक काळानंतर वर्षाला डिव्हिडंड उत्पन्न चालू होईल.

lसंपत्ती निर्मितीबरोबर नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार करता येतात. त्यासाठी प्रथमत: किमान १५ वर्षे सातत्याने गुंतवणूक केली पाहिजे. अल्पकाळासाठी सुरक्षित गुंतवणूक केली पाहिजे आणि दीर्घकाळासाठी जोखीमयुक्त गुंतवणूक केली पाहिजे. इक्विटी म्युच्युअल फंडात बाजाराची जोखीम असते, ती समजावून घेऊन गुंतवणूक केली पाहिजे. संपत्ती निर्मिती (Asset Building) आणि (Passive Income) पैशाचा प्रवाह निर्माण करण्यासाठी परिपूर्ण ब्लूप्रिंट रोड मॅप तयार करावा. त्यासाठी सेबी रजिस्टर आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news