

राजू पाटील
शेअरबाजारात कितीही वादळे आली तरी बुद्धिबळातील उंटाप्रमाणे तिरकी चाल खेळत अचूकपणे केवळ तीसच कंपन्या शोधून त्यात गुंतवणूक करणारा फोकस्ड फंड गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा मिळवून देण्यात अग्रेसर ठरले आहेत. या फंडांनी महागाई दरावरही मात करून दाखविली आहे.
शेअरबाजार गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड अस्थिरता अनुभवत आहे. युक्रेन युद्ध, टॅरिफ वॉर आणि त्यापाठोपाठ इराण युद्धाने जागतिक पातळीवरील समीकरणे पूर्णतः बदलून टाकली. दरम्यान, विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी २०२५ मध्ये १.६६ लाख कोटी रुपये भारतातून काढून घेतले; तर २०२६ मध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यांत तब्बल २.७४ लाख कोटी रुपये काढून घेतले. भारतीय शेअरबाजाराला एकापाठोपाठ दणके बसले, तरी या वादळात फोकस्ड फंड दमदार कामगिरीच्या जोरावर अतिशय भक्कम उभे आहेत. या फंडांनी गत तीन वर्षांत अंदाजे सरासरी १० ते १४ टक्क्यांदरम्यान परतावा दिला असून, सध्याच्या महागाईच्या काळात हा परतावा सुपर डुपर ठरला आहे.
दोन लाख कोटी रुपयांकडे वाटचाल : फोकस्ड फंड हा इक्विटी म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे. या फंडाची मुहूर्तमेढ २००४ मध्ये रोवली गेली. त्यावेळी या फंडांना कन्स्ट्रेटेड फंडस् किंवा बेस्ट आयडिया फंडस् म्हटले जायचे. परंतु, सेबीने सर्व म्युच्युअल फंड योजनांचे वर्गीकरण आणि सुसूत्रीकरण केले. ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबीने ‘फोकस्ड फंड’ ही एक स्वतंत्र आणि अधिकृत श्रेणी घोषित केली. भारतात सध्या २८ फोकस्ड म्युच्युअल फंड असून, अँम्फीच्या ताज्या आकडेवारीनुसार जून २०२६ अखेर या फंडामध्ये गुंतवणूकदारांचा एकूण संकलित निधी (एयूएम) १.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
गुंतवणुकीचा वाढता ओघ : वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत भारतीय म्युच्युअल फंड बाजारातील चढ-उतारांनंतरही फोकस्ड फंडांवर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम राहिला आहे. या सहा महिन्यांत या फंडांनी एकूण ८,०२६ कोटी रुपयांचा भरीव निव्वळ इनफ्लो आकर्षित केला आहे. मार्च २०२६ मध्ये या फंडात सर्वाधिक २,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. दरमहा सरासरी एक हजार रुपयांची गुंतवणूक या फंडात होते. फोकस्ड फंडात अनेक जवळपास सर्वच फंड घराण्यांचे फंड आहेत. उदाहरण द्यायचे तर या श्रेणीत कार्यरत असलेल्या कोटक फोकस्ड फंडाने आपल्या वाटचालीची सात वर्षे गत सप्ताहात पूर्ण केली. ३० जून २०२६ पर्यंत या फंडाची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता ४,२९८ कोटी रुपये आहे. गत सात वर्षांत या फंडाचे मूल्य तीनपटीने वाढले असून, १७ टक्क्यांपेक्षा अधिक वार्षिक चक्रवाढ विकास दराने (सीएजीआर) वाढ मिळवून दिली आहे. गुंतवणूकदारांनी कोटकच्या फंडात दरमहा १०,००० रुपयांची एसआयपी केली असती, तर सात वर्षांत एकूण गुंतवलेली रक्कम आजमितीस ८.४ लाख रुपये झाली असती आणि तिचे मूल्य वाढून १५.२३ लाख रुपये झाले असते. म्हणजेच या गुंतवणुकीवर वार्षिक १६ टक्क्यांपेक्षा जास्त चक्रवाढ परतावा मिळाला असता. या फंडासाठी निफ्टी ५०० हा मुख्य आधारभूत निर्देशांक असून, या निर्देशांकाच्या तुलनेत फंडाने सध्याच्या काळात ३ टक्क्यांपेक्षा अतिरिक्त परतावा (अल्फा रिटर्न) मिळवून दिला आहे.
कोटक फोकस्ड फंड समभाग निवडताना एक खास पद्धत वापरतो. या पद्धतीला ‘डिस्टिलिंग गोल्ड फ्रॉम ओअर’ म्हणजेच खनिजातून सोने शुद्ध करून वेगळे करणे, असे नाव दिलेले आहे. या पद्धतीत अनेक कंपन्यांमधून उत्तम दर्जाच्या कंपन्यांचे समभाग वाजवी किमतीत खरेदी करणे, हे उद्दिष्ट असते. या फंडाच्या पोर्टफोलिओची रचना ‘बारबेल’ पद्धतीवर आधारित आहे. यामध्ये पोर्टफोलिओच्या एका बाजूला देशांतर्गत आर्थिक तेजी-मंदीनुसार वाढणारे समभाग असतात, तर दुसऱ्या बाजूला बाजारात मंदी असतानाही स्थिर राहणारे किंवा कमी जोखीम असलेले समभाग असतात. यामुळे पोर्टफोलिओमध्ये योग्य समतोल राखला जातो.
फोकस्ड फंड गटात एचडीएफसी फोकस्ड फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड इक्विटी फंड आणि इन्व्हेस्को इंडिया फोकस्ड फंड हेसुद्धा आपल्या दमदार कामगिरीमुळे अतिशय लोकप्रिय आणि आघाडीचे फंड ठरले आहे. गत तीन ते पाच वर्षांत या फंडांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिलेला आहे. एचडीएफसी फोकस्ड फंड दीर्घकाळात उत्तम कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. यात फंड मॅनेजर लार्ज-कॅप आणि स्ट्रॉन्ग फंडामेंटल्स असलेल्या कंपन्यांवर जास्त भर देतात. आयसीआयसीचा फंड बाजारातील विविध क्षेत्रांमधील आघाडीच्या कंपन्यांची निवड करून उत्तम पोर्टफोलिओ तयार करतो. याचे फंड मॅनेजमेंट अत्यंत अनुभवी मानले जाते. या फंडाचा ३ आणि ५ वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड खूप मजबूत राहिला आहे. तर, इन्व्हेस्को इंडिया फोकस्ड फंड मागील काही वर्षांत आपल्या दर्जेदार स्टॉक पिकिंगमुळे आघाडीवर राहिला आहे. वाढत्या कंपन्यांची योग्य वेळी निवड करण्याची या फंडाची रणनीती यशस्वी ठरली आहे. या फंडांनी डायरेक्ट प्लॅनअंतर्गत तसेच रेग्युलर प्लॅनअंतर्गत अतिशय दमदार वार्षिक परतावा दिलेला आहे. फोकस्ड फंड त्यांच्या दर्जेदार कामगिरीमुळे सुपर डुपर ठरले आहेत. जोखीम झेलण्याची कुवत असलेल्या आणि किमान पाच ते सात वर्षे गुंतवणुकीचा कालावधी असलेल्यांसाठी विविध फंड घराण्यांचे फोकस्ड फंड सध्याच्या स्थितीत योग्य पर्याय ठरू शकतात.
फक्त तीस शेअरांवर लक्ष
सेबीच्या सध्याच्या नियमांनुसार, या फंडला एका विशिष्ट मर्यादेतच गुंतवणूक करावी लागते. हा मुदतमुक्त स्वरूपातील फंड असून, त्याच्या पोर्टफोलिओमध्ये कमाल ३० शेअर्स ठेवता येतात. या फंडाला एकूण मालमत्तेच्या किमान ८० टक्के रक्कम शेअर्स किंवा शेअर्सशी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवावी लागते. हा फंड लार्ज-कॅप, मिड-कॅप किंवा स्मॉल-कॅप अशा श्रेणीतील कंपन्यांमध्ये कितीही प्रमाणात गुंतवणूक करू शकतो. या फंडात जोखीम जास्त आहे; पण परतावा मिळण्याची क्षमताही तितकीच जास्त असल्याचे गत तीन वर्षांच्या आकडेवारीतून सिद्ध झाले आहे. दमदार परताव्यामुळे हा फंड गुंतवणूकदारांच्या रडारवर आहे.