

Jammu Kashmir accident
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील डोंगराळ डोडा जिल्ह्यात आज (दि. १५) सकाळी प्रवाशांना घेऊन जाणारा एक टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला. यात एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील काहींची प्रकृती गंभीर आहे.
आज सकाळी डोडा-बठार रस्त्यावरील पोंडा परिसरात टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळला. या अपघातात वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले. घटनेनंतर तात्काळ सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी बचावकार्य सुरू केले. त्यांच्यासोबत नागरी प्रशासनाचे कर्मचारीही बचावकार्यात सामील झाले. अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर १७ जण जखमी झाले होते.
जखमींना डोडा येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयात हलवण्यात आले, उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मृतांचा आकडा ५ वर पोहोचला आहे, अशी माहिती डोडाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ओमर कुमार यांनी दिली. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
"काही जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गंभीर जखमींपैकी एकाला पुढील उपचारांसाठी जम्मू येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींना सर्वतोपरी मदत आणि वैद्यकीय उपचार पुरवले जात आहेत. जिल्हाधिकारी स्वतः या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत," असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 'एक्स' वरील पोस्टमध्ये सांगितले.