Tesla showroom Mumbai
मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांची अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने आज भारतात एंट्री केली आहे. जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या कार बाजारात टेस्लाने आपले पहिले शोरूम मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे आजपासून सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन झाले.
हा एक अत्यंत दुर्मिळ योगायोग आहे की, भारतात एक अमेरिकन आणि एक व्हिएतनामी कंपनी एकाच दिवशी एंट्री करत आहेत. एकीकडे टेस्ला ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी आहे, तर दुसरीकडे व्हिएतनामी कंपनी विनफास्ट आजपासून भारतात पदार्पणासोबतच आपल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही मॉडेल्ससाठी अधिकृत बुकिंग सुरू करणार आहे. विनफास्ट ही वेगाने उदयास येणारी कार निर्माता कंपनी आहे. विनफास्टने यापूर्वीच देशातील २७ शहरांमध्ये ३२ डीलरशिपसोबत भागीदारी केली असून, आजपासून आपल्या कार्सची बुकिंग सुरू करणार आहे.
एलॉन मस्क यांच्यासाठी भारतीय बाजारपेठ अत्यंत महत्त्वाची आहे. युरोपियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (ACEA) आकडेवारीनुसार, युरोपमध्ये टेस्लाच्या नवीन कारच्या विक्रीत मे महिन्यात सलग पाचव्या महिन्यात घट झाली आहे. बहुतांश ग्राहक किफायतशीर किमतींमुळे चिनी कार कंपन्यांकडे वळत आहेत. ACEA च्या अहवालानुसार, मे महिन्यात टेस्लाच्या कारची विक्री २७.९ टक्क्यांनी घटून १३,८६३ युनिट्सवर आली आहे. अशा परिस्थितीत, एलॉन मस्क यांच्यासाठी भारतीय बाजारपेठ जिंकणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भारतात आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी, एलॉन मस्क यांनी सरकारवर उच्च आयात शुल्कावरून बाहेरून येणाऱ्या इलेक्ट्रिक कारवरील कर कमी करण्यासाठी दबाव टाकला होता. सुरुवातीला टेस्ला भारतात इलेक्ट्रिक वाहन प्लांट उभारणार असल्याचीही चर्चा होती, पण या मुद्द्यांवर बोलणी यशस्वी झाली नाही. टेस्ला बऱ्याच काळापासून भारतीय बाजारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु पूर्णपणे तयार केलेल्या वाहनांवर लागणारा प्रचंड आयात शुल्क हा सर्वात मोठा अडथळा ठरत होता. मात्र, भारत सरकारच्या नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणामुळे टेस्लाला काहीसा दिलासा मिळाला.
मुंबईत ४ हजार चौरस फुटांमध्ये पसरलेले टेस्लाचे पहिले शोरूम तयार झाले आहे. टेस्लाच्या मुंबईतील पहिल्या शोरूमच्या मुख्य वास्तुविशारद नीता शारदा यांनी सांगितले की, "भारतातील टेस्लाच्या प्रवासाचा भाग होण्याचे भाग्य मला लाभले आहे, मुंबईतील पहिल्या शोरूमचा लूक मिनिमलिस्ट आहे. शोरूमची पार्श्वभूमी पांढऱ्या रंगाची आहे ज्यामध्ये टेस्लाच्या प्रतिमा आणि काही भारतीय प्रतिमा असलेले लाईटबॉक्स आहेत. आम्ही हे काम ४५ दिवसांत पूर्ण केले."
सुरुवातीच्या टप्प्यासाठी चीनमध्ये तयार झालेल्या गाड्यांचा पहिला साठा (सुमारे ५ कार) भारतात दाखल झाला आहे. या शोरूमच्या उद्घाटनासोबतच टेस्लाने दक्षिण आशियाई बाजारात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. या शोरूमला 'एक्सपीरियन्स सेंटर' म्हणूनही पाहिले जात आहे, जिथे भारतीय ग्राहक पहिल्यांदाच टेस्लाच्या कार जवळून पाहू शकतील. मुंबईनंतर टेस्लाचे पुढील शोरूम देशाची राजधानी दिल्लीत उघडले जाईल.
यावर्षी मार्च महिन्यात टेस्लाने आपल्या दोन कार मॉडेल Y आणि मॉडेल 3 यांच्यासाठी होमोलोगेशन अर्ज दाखल केले होते. भारतात नवीन कार लॉन्च करण्यापूर्वी होमोलोगेशन ही एक अंतिम आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया भारतात तयार होणाऱ्या, असेंबल होणाऱ्या किंवा थेट आयात होणाऱ्या (CBU) सर्व गाड्यांना लागू होते. कंपनी सुरुवातीला आपली 'मॉडेल Y' बाजारात उतरवण्याची शक्यता आहे. मॉडेल Y ही एक शक्तिशाली बॅटरी पॅक असलेली मिड-साइज इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. जागतिक मॉडेलनुसार, ही कार एका चार्जमध्ये ५७४ किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते. याशिवाय टेस्ला आपली मॉडेल 3 आणि मॉडेल X (Model X) देखील भारतीय बाजारात आणू शकते, पण मॉडेल X ची किंमत खूप जास्त असेल.
भारत सरकारच्या नवीन धोरणानुसार, टेस्लाच्या कार भारतात खूप महाग असू शकतात. भारतात विकल्या जाणाऱ्या टेस्लाच्या गाड्यांवर सुमारे ७० टक्के आयात शुल्क लागेल. त्यामुळे, भारतात टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत अंदाजे ६० ते ६५ लाख रुपये असू शकते. सुरुवातीला टेस्ला आयात केलेल्या कार भारतात विकणार असली तरी, येथील बाजारपेठेतील मागणीनुसार कंपनी भविष्यात आपल्या धोरणात बदल करू शकते. अशीही चर्चा आहे की, कंपनी भारतासारख्या बाजारपेठेसाठी एका किफायतशीर मॉडेलवर काम करत आहे.