

जयपूरमधील शिव जोहरी यांनी साकारली अनोखी लग्नपत्रिका
या पत्रिकेत एकूण ६५ देवी-देवतांच्या मूर्ती अत्यंत सुबकपणे कोरल्या आहेत
पत्रिकेत भगवान विष्णूंचे १० अवतार आणि भगवान श्रीकृष्णाच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडते
दक्षिण भारतीय शैलीतील कृष्ण आणि अष्टलक्ष्मींच्या प्रतिमांनी ही पत्रिका सजलेली
Unique Wedding Card
जयपूर : आपल्या लेकीचे लग्न संस्मरणीय ठरावे, असे प्रत्येक वडिलांचे स्वप्न असतं. मात्र जयपूरमधील शिव जोहरी यांनी आपल्या मुलीचा विवाह सोहळा शाही करण्यासोबतच मुलीला भेट दिलेली लग्नपत्रिकाही संस्मरणीय ठरवली.
दैनिक 'भास्कर'ने दिलेल्या वृत्तानुसार शिव जोहरी यांनी त्यांची मुलगी श्रुती हिच्या विवाहासाठी ही विशेष कलाकृती साकारली आहे. तब्बल ३ किलो शुद्ध चांदीचा वापर करून साकारलेल्या लग्नपत्रिकेची किंमत तब्बल २५ लाख रुपये आहे. १२८ विविध भागांपासून तयार केलेल्या या पत्रिकेत विशेष म्हणजे कुठेही खिळा किंवा स्क्रूचा वापर करण्यात आलेला नाही.
या पत्रिकेत एकूण ६५ देवी-देवतांच्या मूर्ती अत्यंत सुबकपणे कोरल्या आहेत. पत्रिकेच्या वरच्या भागात 'श्री गणेशाय नम:' मंत्रासह भगवान गणेशाची मूर्ती आहे. त्यांच्या उजव्या बाजूला माता पार्वती आणि डाव्या बाजूला भगवान शिव विराजमान आहेत. त्याखाली लक्ष्मी-नारायणाची प्रतिमा कोरण्यात आली आहे.
८ x ६.५ इंच आकार आणि ३ इंच जाडी असलेल्या या पत्रिकेत भगवान विष्णूंचे १० अवतार आणि भगवान श्रीकृष्णाच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडते. तसेच दक्षिण भारतीय शैलीतील कृष्ण आणि अष्टलक्ष्मींच्या प्रतिमांनी ही पत्रिका सजलेली आहे. पत्रिकेत भगवान व्यंकटेश्वर (तिरुपती बालाजी), शंख-डमरू वाजवणारे देव, दिवे घेतलेल्या देवता आणि सेवक अशा सूक्ष्म कलाकृतींचा समावेश आहे.
ही पत्रिका केवळ एक निमंत्रण नसून तो एक वारसा असल्याचे शिव जोहरी सांगतात. ते म्हणाले, "ही पत्रिका मी स्वतः एका वर्षाच्या मेहनतीतून तयार केली आहे. मला माझ्या मुलीच्या लग्नात केवळ नातेवाईकांनाच नाही, तर सर्व देवी-देवतांनाही निमंत्रित करायचे होते. माझ्या मुलीकडे अशी एखादी वस्तू असावी जी पिढ्यानपिढ्या आठवणीत राहील, हाच यामागचा उद्देश होता."
या पत्रिकेच्या मध्यभागी वधू आणि वर यांची नावे कोरली आहेत. या नावांच्या भोवती हत्ती फुलांचा वर्षाव करत असल्याचे दृश्य साकारले आहे. पत्रिकेच्या आतील भागात पारंपरिक पद्धतीने वधू-वरांच्या पालकांची आणि संपूर्ण कुटुंबाची नावे अतिशय कलात्मकरित्या कोरण्यात आली आहेत. शिव जोहरी यांनी आपल्या मुलीचा विवाह सोहळा शाही करण्यासोबतच मुलीला भेट दिलेली लग्नपत्रिकाही संपूर्ण राजस्थानमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.