अखेर ४६ वर्षांनंतर जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार उघडले

मौल्यवान वस्तूंची होणार डिजिटल यादी
Jagannath temple treasury
४६ वर्षांनंतर जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार उघडले file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचा प्रतिष्ठित खजिना 'रत्न भांडार' आज उघडला आहे. राज्य सरकारने हा खजिना तब्बल ४६ वर्षांनंतर दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या यादीसाठी खुला केला आहे. यापूर्वी तो १९७८ मध्ये उघडण्यात आला होता.

तीन देवतांच्या दागिन्यांचा रत्न भांडार

चार धामांपैकी एक असलेले जगन्नाथ मंदिर १२ व्या शतकात बांधले गेले. या मंदिरात रत्नांचे भांडार आहे. जगन्नाथ मंदिरातील जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या तिन्ही देवतांचे दागिने या रत्नांच्या भांडारात ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. अनेक राजे आणि भक्तांनी दागिने अर्पण केले होते, ते सर्व येथे ठेवले आहेत. या रत्नांच्या भांडारात असलेल्या दागिन्यांचे मूल्य अनमोल असल्याचे सांगितले जाते. आजपर्यंत त्याचे मूल्यमापन झालेले नाही. हे ऐतिहासिक भांडार जगन्नाथ मंदिराच्या जगमोहनच्या उत्तरेकडील तीरावर आहे. पुरी श्री जगन्नाथ मंदिर अधिनियम, १९५२ अंतर्गत तयार केलेल्या अधिकारांच्या नोंदीमध्ये भगवान जगन्नाथाच्या दागिन्यांची यादी समाविष्ट आहे.

Jagannath temple treasury
श्री जोतिबा मंदिर, परिसर विकास प्राधिकरणाची स्थापना

रत्न भांडारात किती खजिना?

श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार रत्न भांडारमध्ये तीन खोल्या आहेत. आतील खोलीत ५० किलो ६०० ग्रॅम सोने आणि १३४ किलो ५० ग्रॅम चांदी आहे. हे दागिने कधीही वापरले गेले नाहीत. बाहेरील खोलीत ९५ किलो ३२० ग्रॅम सोने आणि १९ किलो ४८० ग्रॅम चांदी आहे. हे सणासुदीला काढले जातात. तर तिसऱ्या खोलीत तीन किलो ४८० ग्रॅम सोने आणि ३० किलो ३५० ग्रॅम चांदी आहे. हे दागिने दैनंदिन विधींसाठी वापरले जातात.

आतापर्यंत रत्न भांडार किती वेळा उघडले?

मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रमुख अरविंद पाधी यांनी सांगितले की, यापूर्वी रत्न भंडार १९०५, १९२६ आणि १९७८ मध्ये उघडण्यात आले होते आणि मौल्यवान वस्तूंची यादी तयार करण्यात आली होती. रत्न भांडार शेवटचे १४ जुलै १९८५ रोजी उघडण्यात आले होते. त्यावेळी ती दुरुस्त करून बंद करण्यात आली होती. यानंतर रत्न भांडार कधीच उघडले नाही आणि त्याची चावीही गायब आहे.

Jagannath temple treasury
दिल्ली विद्यापीठ | LLBच्या अभ्यासक्रमात 'मनुस्मृती'चा समावेश नाही - केंद्राची माहिती

६ वर्षांपासून रत्न भांडाराची चावी गायब!

४ एप्रिल २०१८ रोजी रत्न भांडारच्या चाव्या हरवल्याची माहिती समोर आली होती. यानंतर नवीन पटनायक यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते. नोव्हेंबर २०१८ मध्ये आयोगाने ३२४ पानांचा अहवाल सादर केला. अहवालाच्या काही दिवसांनंतर, पुरीच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना गूढपणे चाव्यांचा एक लिफाफा मिळाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. २० मे २०२४ रोजी मोदींनी जगन्नाथ मंदिर सुरक्षित नसल्याचे म्हटले होते. गेल्या सहा वर्षांपासून मंदिरातील रत्न भांडाराची चावी गायब आहे.

आता का उघडले जात आहे?

१९७८ पासून मंदिराकडे किती मालमत्ता आली याचा अंदाज नाही. १२व्या शतकात बांधलेले जगन्नाथ मंदिर हे चार धामांपैकी एक आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत रत्न भांडार उघडणे हा मोठा मुद्दा होता. ओडिशात सरकार आल्यास तिजोरी उघडली जाईल, असे आश्वासन भाजपने दिले होते. याआधी २०११ मध्ये तिरुअनंतपुरमच्या पद्मनाभ स्वामी मंदिराचा खजिना उघडण्यात आला होता. त्यानंतर १.३२ लाख कोटी रुपयांचा खजिना असल्याचे समोर आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news