Jagannath Rath Yatra 2025
पुरी : ओडिशातील पुरी येथे आजपासून भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला आज सुरुवात होत आहे. ही भव्य यात्रा पुरीच्या जगन्नाथ मंदिरापासून सुरू होऊन गुंडिचा मंदिरापर्यंत जाते. देश-विदेशातील लाखो भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून रथयात्रा दुपारी ४ वाजता सुरू होईल.
अशी मान्यता आहे की, भगवान जगन्नाथ वर्षातून एकदा आपली बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्यासोबत आपल्या मावशीच्या घरी, म्हणजेच गुंडिचा मंदिरात जातात. रथयात्रेच्या एक दिवस आधी गुरूवारी हजारो भाविकांनी मंदिराच्या सिंहद्वारावर पोहोचून रत्न वेदीवर (गर्भगृहातील पवित्र मंच) भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांचे नवयौवन दर्शन (तरुण रूप) घेतले. ही रथयात्रा एकूण १२ दिवस चालणार असून, ८ जुलै २०२५ रोजी 'नीलाद्री विजय'ने याची सांगता होईल, जेव्हा देव पुन्हा आपल्या मूळ मंदिरात परततील. जरी रथयात्रेचे आयोजन १२ दिवसांचे असले तरी, त्याची तयारी अनेक महिने आधीपासून सुरू होते. या रथयात्रेदरम्यान अनेक धार्मिक विधी, परंपरा आणि विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात.
आजपासून सुरू होणाऱ्या रथयात्रेबद्दल एडीजी वाहतूक दयाल गंगवार यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, "यावर्षी, एक एकात्मिक कमांड आणि नियंत्रण केंद्र तयार करण्यात आले आहे, जिथे आमच्याकडे संपूर्णपणे AI-आधारित CCTV निगराणी प्रणाली आहे. आम्हाला संपूर्ण पुरी शहरातून वाहतूक आणि पार्किंग संबंधित सर्व माहिती मिळते. सर्व विभागांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली आहे आणि आम्ही एक वॉर रूम देखील स्थापित केला आहे. आम्ही वाहतुकीच्या उद्देशाने ड्रोनचाही वापर करत आहोत." त्यांनी सांगितले की सुरक्षेचीही कडक व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी आम्ही नागरी पोलिसांशी सतत समन्वय साधत आहोत.
२७ जून, शुक्रवार – रथयात्रेची सुरुवात
भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा तीन वेगवेगळ्या भव्य रथांवर स्वार होऊन पुरीच्या जगन्नाथ मंदिरातून निघतात आणि गुंडिचा मंदिराकडे प्रवास करतात. हजारो भक्त मोठ्या दोरखंडाने हे रथ ओढतात. रथावर मूर्ती ठेवण्यापूर्वी पुरीचे राजा ‘छेरा पहंरा’ विधी करतात, ज्यामध्ये ते सोन्याच्या झाडूने रथाचा चौथरा साफ करतात.
१ जुलै, मंगळवार – हेरा पंचमी
जेव्हा भगवान गुंडिचा मंदिरात पाच दिवस घालवतात, तेव्हा पाचव्या दिवशी देवी लक्ष्मी नाराज होऊन भगवान जगन्नाथांना भेटायला येते. या विधीला हेरा पंचमी म्हणतात.
४ जुलै, शुक्रवार – संध्या दर्शन
गुंडिचा मंदिरात विशेष दर्शनाचे आयोजन केले जाते. या दिवशी भक्त भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे दर्शन घेतात आणि हा एक अत्यंत शुभ प्रसंग मानला जातो.
५ जुलै, शनिवार – बहुदा यात्रा
भगवान जगन्नाथ आपल्या भाऊ आणि बहिणीसोबत रथांवर स्वार होऊन पुन्हा जगन्नाथ मंदिराकडे परततात. या परत प्रवासाला बहुदा यात्रा म्हटले जाते. वाटेत ते मावशी माता मंदिरात थांबतात, जिथे त्यांना ओडिशाची खास मिठाई 'पोडा पिठा' चा नैवेद्य दाखवला जातो.
६ जुलै, रविवार – सुना बेशा
या दिवशी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांना सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. हा अत्यंत भव्य शृंगार असतो, जो पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात.
७ जुलै, सोमवार – अधरा पना
या दिवशी देवांना 'अधरा पना' नावाचे एक विशेष गोड पेय अर्पण केले जाते, जे मोठ्या मातीच्या भांड्यांमध्ये तयार होते. यात पाणी, दूध, पनीर, साखर आणि काही पारंपरिक मसाले मिसळले जातात.
८ जुलै, मंगळवार – नीलाद्री विजय (सांगता)
हा रथयात्रेचा शेवटचा आणि सर्वात भावनिक दिवस असतो. या दिवशी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा पुन्हा आपल्या मुख्य मंदिरात परततात आणि गर्भगृहात पुन्हा स्थापित होतात. याला ‘नीलाद्री विजय’ म्हटले जाते, ज्याचा अर्थ आहे "नीलाचल (पुरी) वर पुन्हा विजय".