

IRCTC hotels corruption case |आयआरसीटीसी हॉटेल्स कंत्राट वाटप भ्रष्टाचार प्रकरणी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने आज (दि. १३) माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री राबडी देवी, राजद नेते तेजस्वी यादव आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. हा खटला रांची आणि पुरी येथील दोन आयआरसीटीसी हॉटेल्सच्या निविदेतील कथित भ्रष्टाचाराशी संबंधित आहे.
२००४ ते २००९ दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्या रेल्वेमंत्रीपदाच्या कार्यकाळात आयआरसीटीसी हॉटेल्सच्या देखभालीसाठी कंत्राट वाटपात झालेल्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. २४ सप्टेंबर रोजी विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री राबडी देवी, त्यांचा मुलगा आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि इतर आरोपींना त्या तारखेला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.या प्रकरणातील सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने २९ मे पर्यंत आपला निर्णय राखून ठेवला होता.
IRCTC भ्रष्टाचार प्रकरणी प्रकरणात लालू प्रसाद यादव कुटुंबातील सदस्यांवर खटला चालवायचा की नाही हे न्यायालयाच्या आदेशावरून आता निश्चित झाले आहे. या प्रकरणात एकूण १४ आरोपी आहेत.
आयआरसीटीसीच्या टेंडर मध्ये बदल करून लालू प्रसाद यादव यांनी हॉटेल सुजाताला देण्यात आले होते. या टेंडरचा फायदा लालू यादवच्या कुटुंबियांना मिळाला, असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. या प्रकरणी सीबीआय चौकशी झाली. बीएनआर होटल एका कंपनीला चालवायला दिले होते. याची प्रक्रिया लालू यादव यांना माहित असल्याचं दिसून येत आहे. लालू प्रसाद यादव यांना या घोटाळ्याची माहिती होती.राबडी देवी यादव आणि तेजस्वी यादव यांनी कमी किंमतीत जमीन मिळाली. ही जमीन कंपनीला होटलचे टेंडर देण्याच्या बदल्यात मिळाली, असे अनेक पुरावे सीबीआयने सादर केले होते.
आजच्या सुनावणीवेळी राऊंज अव्हेन्यू कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना विचारल की, तुम्हाला आरोप मान्य आहेत का ? तुम्ही केलेल्या कृत्याबद्दल तुम्हाला वाईट वाटतं ? लालू प्रसाद यादव यांनी सर्व आरोप खोटे आहेत, असा दावा केला. कोर्टाने हा युक्तीवाद फेटाळत लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि राबडी देवी यांच्या वरील आरोप निश्चीत केले. कोर्टाने राबडी देवींना त्यांच्यावरील आरोपांची माहिती दिली .राबडी देवी यांनीही कट रचणे आणि फसवणुकीचे आरोप फेटाळून लावले आहेत.तेजस्वी यादव यांनीही आरोप फेटाळले असून कायदेशीर कारवाईला सामोर जाऊ, असे सांगितले. आता या प्रकरणी लालू प्रसाद यादव, राबडीदेवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १२० ब आणि ४२० अंतर्गत खटला चालवला जाणार आहे.