

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालायने राष्ट्रीय जनता दला (राजद) चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना झटका दिला आहे. ‘लँड फॉर जॉब’ गैरव्यवहार संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी लालू यादव यांनी केली होती. त्यांची ही मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या प्रकरणी सीबीआयने चौकशी केली आहे.
लालू यादव यांच्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत या प्रकरणातील एफआयआर आणि तपास कायदेशीर नाहीत, असे म्हटले होते. जेव्हा एफआयआर आणि तपास योग्य नसतो तेव्हा आरोपपत्र कायदेशीररित्या कायम ठेवता येत नाही, असा युक्तीवाद याचिकेत करण्यात आला होता. तर सीबीआयने लालू यादव यांच्या मागणीला विरोध केला. दरम्यान, यावर्षी बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी लालू यादव यांना हा झटका बसल्याची चर्चा आहे.