Land-For-Jobs Case| लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ; 'लँड फॉर जॉब' प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दणका
नवी दिल्ली : लॅंड फॉर जॉब प्रकरणाला स्थगिती देण्यास नकार देत लालू प्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने आधीच हा निर्णय दिला होता. दिल्ली उच्च न्यायालयाचा हा निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
लालू प्रसाद यादव यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आम्ही स्थगिती देणार नाही. मुख्य खटल्याचा निर्णय होऊ द्या. जेव्हा उच्च न्यायालय आधीच खटल्याची सुनावणी करत आहे, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. मात्र खटल्यादरम्यान लालू प्रसाद यादव यांना वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असेही न्यायालयाने म्हटले त्यामुळे हा त्यांना हा काहीसा दिलासा मानला जातो. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे लालू प्रसाद यादव यांना आता या घोटाळ्याशी संबंधित खटल्याला सामोरे जावे लागेल. जर ते या प्रकरणात दोषी आढळले तर त्यांना तुरुंगातही जावे लागू शकते.

