

International Yoga Day 2026 PM Modi Kolkata
कोलकाता: "आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण देश आणि जग एकवटलेले दिसून आले, योग ही लोकांना जोडणारी आणि मानवतेला एकत्र आणणारी शक्ती आहे," असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज (दि. २१) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथील प्रसिद्ध 'रेड रोड'वर जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, योग केवळ निरोगी वृद्धत्वाची हमीच देत नाही, तर तो मानवतेचा पुरस्कार करत जगाला एकत्रही आणतो.
आपल्या १५ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, "'निरोगी वृद्धत्वासाठी योग' ही संकल्पना केवळ ज्येष्ठांसाठीच नाही, तर सर्व वयोगटांतील लोकांसाठी आहे, असे मानले पाहिजे. योग ही केवळ आपल्या जीवनशैलीसाठीच नव्हे, तर जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही एक गरज आहे."
त्यांनी लोकांना योग केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता, वर्षभर त्याचा सराव करण्याचे आवाहनही केले. पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, "योग आज केवळ आपल्या वैयक्तिक जीवनशैलीसाठीच आवश्यक नाही, तर जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही योग ही एक गरज आहे... आपण योगाला केवळ एका दिवसापुरते किंवा एका कार्यक्रमापुरते मर्यादित ठेवणार नाही, तर योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवू."
आज भारत आणि जगभरात सामूहिक योग सत्रांद्वारे हा वार्षिक कार्यक्रम साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाता येथील 'रेड रोड'वरून देशातील १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याचे नेतृत्व करत आहेत. परदेशातील २१० हून अधिक भारतीय दूतावास आणि मिशन जगभरातील सुमारे २,५०० ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, तर देशांतर्गत १०० प्रमुख सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांवर विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत.
'निरोगी वृद्धत्वासाठी योग' ही या वर्षीची संकल्पना शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य व सुस्थिती जपण्यात योगाची भूमिका अधोरेखित करते. कोलकाता येथील सोहळ्यात सुमारे १० लाख लोक सहभागी झाले आहेत, तर 'कॉमन योग प्रोटोकॉल' सत्रात पंतप्रधानांसोबत सुमारे ३५,००० लोक सहभागी झाले आहेत.