

IndiGo flight Patna to Ranchi vulture strike at 4000 feet Ranchi emergency landing Birsa Munda Airport incident
रांची : पाटणा येथून रांचीकडे येणाऱ्या इंडिगोच्या प्रवासी विमानाला 4000 फूट उंचीवर गिद्धाचा धक्का बसल्याने विमानात तांत्रिक बिघाड झाला. या घटनेनंतर वैमानिकाने तातडीने निर्णय घेत, विमानाची सुरक्षितपणे आपत्कालीन लँडिंग रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर केली. विमानात 175 प्रवासी प्रवास करत होते, आणि सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ही घटना सोमवारी दुपारी 1.14 वाजता घडली. विमान रांचीपासून 10 ते 12 नॉटिकल मैल अंतरावर होते आणि 3000 ते 4000 फूट उंचीवर उड्डाण करत असताना विमानाला गिधाडाने धडक दिली. त्यामुळे विमानाला धक्का बसला. विमानाच्या संरचनेला (फ्युसेलाज) डेंट पडल्याची माहिती देण्यात आली आहे.
बिरसा मुंडा विमानतळाचे संचालक आर. आर. मौर्य यांनी माहिती देताना सांगितले की, “विमानात सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही. विमानाला झालेल्या नुकसानाची इंजिनीअर तपासणी करत आहेत. विमानाचे पुढील उड्डाण कोलकात्याच्या दिशेने होणार होते, पण आता ते पुढील निर्णयासाठी थांबवण्यात आले आहे.”
भारतातील विमानवाहतुकीमध्ये पक्ष्यांनी दिलेल्या धडकांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे. यामुळे प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेची बाब बनली आहे. अशा घटना टाळण्यासाठी विमानतळ परिसरातल्या घनकचरा व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे विमानतळ प्रशासनाने यापूर्वीही नमूद केले आहे.
भारतात पक्ष्यांच्या धडकेमुळे अनेक गंभीर विमान अपघात घडले आहेत.
25 मे 2023 रोजी मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर, दुबईकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला टेकऑफ करताना पक्ष्याचा धक्का बसला. या घटनेमुळे विमानाचे उड्डाण थांबवले गेले.
25 मे 2024 रोजी थिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर, एअर इंडियाच्या ए-320 विमानाच्या डाव्या इंजिनला पक्ष्याचा धक्का बसला, ज्यामुळे इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. पायलटने तातडीने निर्णय घेत, विमान सुरक्षितपणे परत विमानतळावर उतरवले.
20 मे 2024 रोजी मुंबईतील घाटकोपर उपनगरात, दुबईहून येणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 777 विमानाला फ्लेमिंगो पक्ष्यांचा थवा धडकला. या घटनेत विमानाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. तसेच 36 फ्लेमिंगो पक्षी मृत्युमुखी पडले. विमान सुरक्षितपणे लँड झाले, पण पुढील उड्डाण रद्द करण्यात आले.
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2022-23 मध्ये अशा घटनांमध्ये 35 टक्के वाढ झाली होती. या कालावधीत 38 विमानांना पक्ष्यांचा धक्का बसला होता.
केरळमध्ये 2018 ते 2023 या काळात 350 पक्ष्यांच्या धडकांच्या घटना घडल्या. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वाधिक 187 घटनांची नोंद झाली.