

Bangladesh ex army officer provocative statement : "भारताचे तुकडे झाल्याशिवाय बांगलादेशात 'संपूर्ण शांतता' नांदणार नाही," अशा शब्दांमध्ये बांगलादेशाचा माजी लष्करी अधिकारी ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) अब्दुल्लाहिल अमान अझमी याने भारताविरोधात गरळ ओकली. कुख्यात युद्ध गुन्हेगार गुलाम आझम याचा मुलगा असलेल्या अझमी याने ढाका येथील नॅशनल प्रेस क्लबमधील कार्यक्रमात भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये केली.
गुलाम आझम हा १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान हिंदू आणि मुक्ती समर्थक बंगाली लोकांच्या नरसंहारासाठी जबाबदार असलेले दोषी युद्ध गुन्हेगार होता. त्याचा मुलगा असलेल्या अझमी याने भारतावर १९७५ ते १९९६ या काळात चट्टग्राम हिल ट्रॅक्ट्स प्रदेशात अशांतता भडकावल्याचाही आरोप केला. तसेच १९९७ मध्ये स्वाक्षरी झालेल्या चट्टग्राम हिल ट्रॅक्ट्स शांतता करारावरही टीका केली. शस्त्रसमर्पण "केवळ दिखाव्यासाठी" होते, असा आरोप त्याने केला. अनेक दशके चाललेले बंड संपवण्यासाठी २ डिसेंबर १९९७ रोजी ढाका येथे बांगलादेश सरकार आणि PCJSS यांच्यात हा शांतता करार झाला होता. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर भारत आणि बांगलादेश संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असतानाच, अझमी यांचे वक्तव्य दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव वाढविणारे ठरले आहे.
माजी लष्करी अधिकारी आणि संरक्षण तज्ज्ञ कर्नल मयंक चौबे यांनी या विधानाला "चुकीचे वक्तव्य" मानण्यास नकार दिला आहे. हे विधान म्हणजे बांगलादेशच्या सत्ता-प्रणालीतील काही भागांमध्ये शांतपणे पसरलेली एक "विचारसरणी" आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. "अशा प्रकारची विधाने उघड करतात की आज अतिरेकी गटांना इतके बळ का मिळत आहे... भारताने सतर्क, तयार आणि आपल्या शेजारच्या अशा शक्तींबद्दल पूर्णपणे जागरूक असले पाहिजे, जे मुत्सद्देगिरीसाठी हसतानाही उघडपणे आपल्या देशाच्या विघटनाची स्वप्ने पाहतात," असे कर्नल चौबे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.