

Indigo Flight Cancellation Compensation India: इंडिगोच्या फ्लाइट रद्द झाल्यामुळे हजारो प्रवासी अडचणीत सापडले होते, त्याबद्दल इंडिगोने दिलगिरी व्यक्त करत मोठी घोषणा केली आहे. 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी ज्यांच्या फ्लाइट रद्द झाल्यात, अशा प्रत्येक प्रवाशाला कंपनीकडून 10,000 रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर देण्यात येणार आहे. हे व्हाउचर पुढील एक वर्षभर कोणत्याही इंडिगो फ्लाइट बुकिंगमध्ये वापरता येणार आहे.
कंपनीने मान्य केले की तीन दिवस अनेक प्रवाशांना तासंतास विमानतळावर थांबावे लागले, काहींच्या कनेक्टिंग फ्लाइट्स चुकल्या, तर काहींची महत्त्वाची कामे झाली नाहीत. इंडिगोने म्हटलं आहे की, “हा काळ आमच्यासाठी आणि प्रवाशांसाठी कठीण होता. या गैरसोयीची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो.”
भारताच्या नागरी विमान वाहतूक नियमांनुसार, 24 तासांच्या आत फ्लाइट रद्द झाल्यास एअरलाइनला प्रवाशांना भरपाई देणे बंधनकारक आहे.
या नियमांनुसार:
प्रवासाचे अंतर
फ्लाइटचा कालावधी
या आधारे प्रवाशांना 5,000 ते 10,000 रुपये अतिरिक्त भरपाई मिळू शकते. याचा अर्थ अंतर जास्त असेल तर काही प्रवाशांना एकूण 20,000 रुपयापर्यंतची भरपाई मिळण्याची शक्यता आहे.
इंडिगोने सांगितले की रद्द झालेल्या फ्लाइट्सची रिफंड प्रक्रिया करण्यात येत असून उर्वरित रिफंड लवकरच दिला जाणार आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म, ट्रॅव्हल एजन्सी किंवा अॅपद्वारे बुकिंग केलेले तिकीटही रिफंडच्या प्रक्रियेत आहे. ज्यांना रिफंडची माहिती मिळत नसल्यास ते थेट मेलद्वारे संपर्क करू शकतात: customer.experience@goindigo.in
कंपनीच्या म्हणण्यानुसार:
प्रवासी तासंतास रांगेत उभे राहिले
काहीजण रात्रभर विमानतळावर अडकले
पुढील प्रवासाचे नियोजन बिघडले
यामुळे प्रवाशांना 10,000 रुपयांचे व्हाउचर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिगोने म्हटले आहे “आमच्या सेवा पुन्हा स्थिर आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी आम्ही प्रत्येक पाऊल उचलत आहोत. प्रवाशांनी दाखवलेल्या संयमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.”