

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण युद्धामुळे वाढलेले कच्च्या तेलाचे दर, रुपयाचे अवमूल्यन, वेगाने आटणारा विदेशी गंगाजळीचा साठा, व्यापार अनिश्चितता अशा खडतर स्थितीतही एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ७.८ टक्क्यांनी वाढल्याची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) सोमवारी दिली.
एप्रिल ते जून २०२५मध्ये जीडीपी ६.९ टक्क्यांनी वाढला होता, तर मार्च २०२६ अखेरीसच्या तिमाहीत जीडीपी ८.६ टक्क्यांनी वाढला. जून २०२६ अखेरीस संपलेल्या तिमाहीत कृषी आणि खाण क्षेत्राची कामगिरी खराब झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कृषी क्षेत्राची वाढ ४.४ वरून ३.६ टक्क्यांवर मंदावली आहे. मॉन्सूनच्या सुरुवातीस घटलेल्या पर्जन्यमानाचा फटका कृषी क्षेत्राला बसला आहे. गतवर्षी याच कालावधीत खाण क्षेत्राने १२.४ टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवली होती. यंदा वाढीची गती २.४ टक्क्यांवर घसरली आहे. सरकारचा भांडवली खर्च गतवर्षीच्या तुलनेत ९.१ वरून १८.६ टक्क्यांनी वाढला आहे.
उत्पादन क्षेत्रात चांगली वाढ
उत्पादन क्षेत्राने गतवर्षीच्या तुलनेत ८.३ वरून ९.२ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. गतवर्षीच्या तिमाहीत विजेची मागणी १.८ टक्क्यांनी वाढली होती. यंदा त्यात ८.९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. बांधकाम क्षेत्राने ५.२ वरून ७.७ टक्क्यांची चांगली वाढ नोंदवल्याने अर्थगतीस चालना मिळाली. औद्योगिक उत्पादनामध्ये जूनच्या तिमाहीत ५.७ टक्क्यांची वाढ झाली. गतवर्षी याच कालावधीत ३.८ टक्क्यांची वाढ नोंदविली होती. देशांतर्गत मागणी चांगली असून, वाहनांच्या विक्रीत तब्बल २५.६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत वाढीचा टक्का जवळपास दुप्पट आहे.
गेल्या ५० वर्षांत तीनदाच जीडीपी गेला ९ टक्क्यांवर
देशाचा जीडीपी सन २००० ते २०२४ या कालावधीत सरासरी ६.३ टक्क्यांनी वाढला आहे. सध्याच्या स्थितीनुसार भारताची क्षमता ७.५ ते आठ टक्के वाढीची आहे. गेल्या ५० वर्षांत भारताने १९७५, १९८८ आणि २०२१ या तीन वर्षांत ९.२५ टक्क्यांवर वाढ नोंदवली आहे.
हीच भारताची खरी ताकद : पंतप्रधान मोदी
जागतिक परिस्थिती आव्हानात्मक असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेने दमदार कामगिरी बजावली. ही तमाम देशवासीयांची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. भारतात आता मंदी येईल, अशी निराशावादी भूमिका मांडणाऱ्या मंडळींचा यामुळे मुखभंग झाल्याचा टोलाही त्यांनी लागावला आहे.