Vikram-1 Launch: ४६ वर्षांनी पुन्हा इतिहास रचला; भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट 'विक्रम-१' अंतराळात झेपावले

भारताने पहिले खासगी ऑर्बिटल-श्रेणीचे रॉकेट स्कायरूट एरोस्पेसचे 'विक्रम-1' प्रक्षेपित करण्यात आले.
Vikram-1 launch ISRO
Vikram-1 launch ISROANI
Published on
Updated on

Skyroot Vikram-1 launch

हैदराबाद : भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. इस्रोने 46 वर्षांपूर्वी ज्या श्रीहरिकोटा प्रक्षेपण केंद्रावरून एसएलव्ही-3 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून भारताला उपग्रह प्रक्षेपणक्षम राष्ट्रांच्या यादीत स्थान मिळवून दिले होते, त्याच प्रक्षेपणपॅडवरून आज देशातील पहिले खासगी कक्षीय रॉकेट 'विक्रम-१' प्रक्षेपित करून यशस्वीरीत्या कक्षेत पोहोचवले. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे, खासगीरीत्या कक्षीय प्रक्षेपण क्षमता प्राप्त करणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे.

18 जुलैचा ऐतिहासिक योगायोग

आज सकाळी 11.30 वाजता सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथील पहिल्या लॉन्च पॅडवरून 'आगमन' मोहिमेअंतर्गत 'विक्रम-1'चे पहिले ऑर्बिटल चाचणी उड्डाण झाले. ४६ वर्षांपूर्वी 18 जुलै 1980 रोजी इस्रोने श्रीहरिकोटा येथून एसएलव्ही-3 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून 'रोहिणी आरएस-1' उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला होता. या यशानंतर भारत स्वतःच्या बळावर उपग्रह प्रक्षेपित करणारा जगातील सहावा देश ठरला होता.

22 मीटर उंच, 17 टन वजनाचे, चार टप्प्यांचे आणि पूर्णपणे सॉलिड इंधनावर चालणारे एसएलव्ही-3 हे लो अर्थ ऑर्बिटमध्ये 40 किलोपर्यंतचा पेलोड पोहोचवू शकत होते. विशेष म्हणजे, तब्बल 46 वर्षांनंतर SLV-3 प्रमाणेच, २२ मीटर उंच 'विक्रम-१' या रॉकेटने इस्रोच्या लाँच पॅडवरून उड्डाण घेतले.

भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी मोठा टप्पा

स्कायरूट एरोस्पेसचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन कुमार चंदाना यांनी सांगितले की, "इस्रोच्या लॉन्च पॅडवरून उड्डाणे केलेले पहिले खासगी रॉकेट आहे. हा क्षण केवळ आमच्या कंपनीसाठीच नव्हे, तर भारताच्या संपूर्ण खासगी अंतराळ क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे."

'विक्रम-1'ची वैशिष्ट्ये काय?

'विक्रम-1' हे सुमारे सात मजली इमारतीएवढ्या उंचीचे मल्टी-स्टेज लॉन्च व्हेईकल आहे. संपूर्ण रॉकेट कार्बन कॉम्पोझिट संरचनेत तयार करण्यात आले असून, त्यामध्ये स्कायरूटने विकसित केलेली प्रोपल्शन प्रणाली वापरण्यात आली आहे. यात उच्च क्षमतेचे सॉलिड-फ्यूल बूस्टर आणि 3D-प्रिंटेड इंजिनचा समावेश आहे.

हे रॉकेट 350 किलोग्रॅमपर्यंत वजनाचे उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या पहिल्या चाचणी उड्डाणाचे उद्दिष्ट 450 किलोमीटर उंचीवरील आणि ६० अंशांचा कल असलेल्या कक्षेत पोहोचणे हे आहे.

तंत्रज्ञानाची मोठी कसोटी

सुमारे 16 मिनिटे चाललेली ही चाचणी मोहीम व्यावसायिक प्रक्षेपणापेक्षा तंत्रज्ञानाची क्षमता सिद्ध करण्यासाठी अधिक महत्त्वाची मानली आहे. आतापर्यंत जमिनीवर चाचणी घेण्यात आलेल्या विविध प्रणालींचा प्रत्यक्ष उड्डाणातील डेटा या मोहिमेद्वारे संकलित केला आहे. या माहितीच्या आधारे 'विक्रम' लॉन्च व्हेईकल कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यांना दिशा मिळणार असल्याचे स्कायरूटने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news