

Indian Railways CCTV Installation Rail coach surveillance Passenger safety Women safety Digital surveillance AI in railway safety
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलं आहे की लवकरच देशातील सर्व 74,000 डब्यांमध्ये आणि 15,000 इंजिनांमध्ये अत्याधुनिक CCTV कॅमेरे बसवले जाणार आहेत.
सध्या ही यंत्रणा प्रायोगिक स्वरूपात उत्तर रेल्वेमध्ये वापरली जात होती आणि त्याचे परिणाम सकारात्मक आढळले.
रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की प्रत्येक डब्यामध्ये चार 'डोम टाईप' CCTV कॅमेरे बसवले जातील. दोन समोरील व दोन मागील दरवाजांजवळ हे सीसीटीव्ही असतील.
तर इंजिनमध्ये सहा कॅमेरे असतील. यात पुढे, मागे, दोन्ही बाजूंना आणि दोन्ही कॅबिनमध्ये प्रत्येकी एक कॅमेरा तसेच दोन डेस्क-लावलेले मायक्रोफोनदेखील बसवले जातील.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं की, या निर्णयामुळे विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक प्रभावीपणे हाताळला जाईल. "एकट्या किंवा इतर प्रवाशांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना अनेकदा असुरक्षित वाटते. आता 24 बाय 7 ऑनलाइन निगराणी होईल," असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
प्रवाशांच्या गोपनीयतेचा विचार करताना, कॅमेरे केवळ डब्यांच्या सामान्य हालचाली क्षेत्रात (दरवाज्याजवळ) लावले जाणार आहेत. यामुळे डब्यांमधील खासगी भाग किंवा शयनक्षेत्र सुरक्षित राहील.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलं आहे की हे सर्व कॅमेरे STQC प्रमाणित असतील आणि कमी प्रकाशातही स्पष्ट चित्रफिती मिळतील. अगदी 100 किमी प्रतितासह वेगाने धावणाऱ्या गाड्यांमध्येही हे सीसीटीव्ही उत्तमरित्या काम करू शकतील.
याशिवाय, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कॅमेर्यांद्वारे मिळणाऱ्या डेटावर IndiaAI मिशनच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्याच्या शक्यतेचाही विचार करण्याचे आदेश दिले आहेत.