

Brazil scraps Akash deal Akash Missile System India Brazil defence relations EMADS vs Akash
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेसाठी एक मोठा धक्का बसला आहे. लॅटिन अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश असलेल्या ब्राझिलने भारताच्या स्वदेशी ‘आकाश’ एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीमची खरेदी प्रक्रिया थांबवली आहे.
या निर्णयामागे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘आकाश’ प्रणालीचे काही ऑपरेशनल (कार्यकारी) बाबतीतील अपयश असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, ब्राझिलच्या दौऱ्यावरून नुकतेच परतलेले पंतप्रधान मोदी यांना ब्राझिलने सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविले होते. त्या पार्श्वभुमीवर ब्राझिलच्या या निर्णयाने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ब्राझील सरकार आणि लष्कराने आता युरोपमधील नामांकित संरक्षण क्षेत्रातील कंपनी MBDA कडे आपला कल वळवला आहे. ही कंपनी EMADS (Enhanced Modular Air Defence Solutions) ही प्रणाली पुरवते, जी सध्या NATO देशांमध्ये वापरली जात असून, अत्यंत विश्वासार्ह मानली जाते.
ब्राझिलच्या ‘The Rio Times’ या माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, MBDA आणि ब्राझील यांच्यात सुमारे 1 अब्ज अमेरिकन डॉलर्स (अंदाजे 8300 कोटी रुपये) च्या संरक्षण करारावर चर्चा सुरू आहे. ही डील लॅटिन अमेरिकेमधील आत्तापर्यंतची सर्वात मोठी एअर डिफेन्स डील ठरण्याची शक्यता आहे.
ब्राझिलियन सैन्याच्या मतानुसार, ‘आकाश’ मिसाईल सिस्टीम हाय-स्पीड आणि लो-अल्टिट्यूड (कमी उंचीवरून येणारे) हल्ले हाताळण्यात फारशी सक्षम नाही.
आधुनिक युद्धपद्धतींमध्ये ड्रोन्स, क्रूझ मिसाईल्स, आणि स्मार्ट बम्स यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अशा वेळी एका एअर डिफेन्स सिस्टीमकडून वेगवान प्रतिसादाची अपेक्षा असते. पण ‘आकाश’ या अपेक्षांवर खरी उतरत नाही, असा ब्राझीलचा निष्कर्ष आहे.
‘आकाश’ ही DRDO (Defence Research and Development Organisation) ने विकसित केलेली एक प्रमुख स्वदेशी प्रणाली आहे.
भारत सरकारने तिला जागतिक बाजारात उभं करण्याचा प्रयत्न केला, पण ब्राझीलचा निर्णय हे दर्शवतो की अनेक परदेशी लष्करे अजूनही NATO-मानांकन असलेल्या प्रणालींवर अधिक विश्वास ठेवतात.
यामुळे भारताला आपली निर्यातयोग्य संरक्षण उत्पादने अधिक बळकट आणि आधुनिक करावी लागतील.
ब्राझीलचा हा निर्णय भारतासाठी एक मोठा बोध देणारा आहे. ‘आकाश’सारख्या प्रणाली जगभरात स्पर्धात्मक राहाव्यात यासाठी त्यांची कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि तंत्रज्ञान यावर अधिक काम करण्याची गरज आहे.
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच 5 ते 8 जुलै 2025 या चार दिवसांत ब्राझिल दौरा करुन परतले. त्यांनी 17व्या BRICS समिटमध्ये रोमियो डी जनेरिओ येथे सहभाग घेतला आणि पुढे राज्य भेटीसाठी ब्रासीलियामध्ये गेले. मोदी ब्राझिलला भेट करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले.
ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुला द सिल्वा यांच्या आमंत्रणानुसार, मोदींना ‘Grand Collar of the National Order of the Southern Cross’ या ब्राझिलच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. या पार्श्वभूमीवर ब्राझिलने आकाश एअर डिफेन्स यंत्रणा खरेदी करण्यास नकार दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.