

BJP leader Surendra Kewat murder Patna Bihar Politics Assembly election Tejashwi yadav Rahul Gandhi reactis
पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे भाजप नेत्याचा खूनाची घटना घडली आहे. भाजप नेते सुरेंद्र केवट यांना भरदिवसा गोळ्या झाडून ठार करण्यात आले. नामांकित उद्योजक गोपाल खेमका यांची त्यांच्याच घराबाहेर गोळ्या घालून हत्या झाली होती. त्याला आठवडा झालेला नसतानाच या हत्येमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
52 वर्षीय सुरेंद्र केवट शेखपूरा जिल्ह्यातील शेतामध्ये काम करत असताना, दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी स्थितीत त्यांना तत्काळ पाटणा येथील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर भाजप आमदार गोपाल रवीदास आणि माजी मंत्री श्याम रजक यांनी रुग्णालयात भेट देऊन केवट कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांनी रुग्णालय प्रशासनास तातडीने शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले.
ही हत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप युतीचे सरकार आहे. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. "आता पाटणामध्ये भाजप नेत्याची हत्या झाली आहे! आता कुणाला काय सांगायचं? एनडीए सरकारमध्ये कोणी ऐकायला तयार आहे का?" अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
ते पुढे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांची तब्येत सगळ्यांना माहिती आहे, पण भाजपचे दोन उपमुख्यमंत्री काय करत आहेत?"
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही यावर प्रतिक्रिया देताना बिहारला गुन्हेगारीचे राजधानी बनवण्याचा आरोप भाजप-जेडीयू युतीवर केला आहे. त्यांनी म्हटले, "बिहारमध्ये लूट, गोळीबार आणि हत्या यांची छाया पसरली आहे. सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे."
दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी या आरोपांवर पलटवार केला आहे. त्यांनी म्हणाले, "आज मुख्यमंत्री निवासात गुन्हेगारांना स्थान नाही. तेथून त्यांच्यावर कारवाईच होते. आरजेडी स्वतःच गुन्हेगारांना पाठिंबा देत आहे, आणि त्याच माध्यमातून राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे."
शेखपूराचे पोलीस अधिकारी कन्हैया सिंह यांनी सांगितले की, "सुरेंद्र केवट शेतात काम करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. आम्ही नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहेत. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून धाडसत्र राबवले जात आहे. फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे."
सुरेंद्र केवट हे भाजप किसान मोर्चाचे माजी पदाधिकारी होते. त्यांची हत्या केवळ भाजपसाठीच नाही, तर संपूर्ण राज्यातील सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण करणारी आहे.