

Indian Railway Change Dress Code: भारत सरकारनं वसाहतवादाच्या खुणा आणि मानसिकता बदलण्याचा चंग बांधला आहे. त्यानुसार आता रेल्वे प्रशासनामध्ये देखील मोठे बदल करण्यात येणार आहेत. आता रेल्वे अधिकाऱ्यांच्या अंगावरील बंद गळ्याचा काळा कोट जाणार आहे. हा पोशाख इंग्रजांच्या काळापासून वापरण्यात येत होता. आता रेल्वे मंत्रालयानं यात बदल करण्याचा निर्णय घेतला असून स्वदेशी पोशाख अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर रेल्वे मंत्रालय रेल्वेच्या प्रभागांसह इतर ठिकाणांना ब्रिटीशांनी दिलेली नावे बदलणार असून आता त्यांना भारतीय नाव देण्यात येणार आहेत.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात रेल्वेच्या नव्या निर्णयाबाबत विचार सूरू असल्याची माहिती दिली. त्यांनी वॉल्टेयर रेल्वे विभागाचं नाव विशाखापट्टणम रेल्वे प्रभाग झालं पाहिजे असं वक्तव्य केलं. वॉल्टेयर हे एक फ्रान्सचे लेखक होते. त्यांना युरोपातील वैचारिक चळवळीतला एक प्रमुख चेहरा मानलं जात होतं.
दरम्यान रेल्वे आता आपल्या कर्मचाऱ्यांना स्कील डेव्हलप करण्यासाठी लष्करासरखं प्रमोशन देणार आहे. आधी ज्या कामासाठी त्यांना निवडण्यात आलं होतं ते काम देण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या स्कील डेव्हल्पमेंटवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.
रेल्वे विभाग हा २०२४ पर्यंत विकसित भारतासाठी विकसित रेल्वे तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्यासाठी नवे मापदंड ठरवले जाणार आहेत. यासाठी नवीन कल्पना राबवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी आर्थिक मदत देखील केली जाणार आहे.
नवीन कल्पनेसाठी पुढच्या वर्षी १२ नवे पुरस्कार देखील देण्यात येणार आहेत. यासाठी पोर्टल देखील सुरू करण्यात आलं आहे. यात भाग घेणाऱ्यांना आणि चांगली कल्पना पुढे आणणाऱ्यांना करोडो रूपयांचे पुरस्कार देखील दिले जाणार आहेत. त्यांची कल्पना चांगली असेल तर त्यांना चार वर्षे त्यावर काम करण्याची संधी देखील दिली जाणार आहे.