Operation Sindoor ‘अजूनही तैनात... कारवाईस केव्हाही तयार’ ; नौदलाचा पाकिस्तानला पुन्हा इशारा
नवी दिल्ली : दहशतवाद्यांचा पाठीराखा असलेल्या पाकिस्तानने अरबी समुद्रात कोणत्याही कारवाया केल्या तर भारत "निर्णायक" कारवाई करण्यास तयार असल्याचा इशारा भारतीय नौदलाने रविवारी (दि.११) दिला होता. त्यानंतर आज (दि.१२) पुन्हा एकदा शत्रुला धडकी भरवणारी ताकद भारतीय नौदलाने दाखवली आहे.
दृढ निश्चयाचे पंख, अचूकतेने आरंभ...
भारती नौदलाने लढण्यासाठी सदैव सज्ज — कोणत्याही वेळी, कुठेही, कोणत्याही प्रकारे असे म्हणत समुद्रातून लढाऊ विमान उड्डाणाच्या विहंगमय दृश्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. नौदलाने या व्हिडिओसोबत "दृढ निश्चयाचे पंख, अचूकतेने आरंभ...जिथे अटकाव ठरतो निर्णायक कृतीत!" असे म्हणत शत्रूला पुन्हा धडकी भरवली आह
नौदलाकडून सीहंटरचा चित्त थरारक व्हिडिओ शेअर
यापूर्वी भारतीय नौदलाने समुद्रातील कवायतीचा प्रकार सीहंटरचा (SeaHunters) व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला 'आकाशाचे अधिपती; समुद्राच्या तळाचे शिकारी...', लढण्यासाठी सदैव सज्ज, समुद्रावरनिर्भय, कोणत्याही वेळी कोठेही कोणत्याही प्रकारे" असे कॅप्शन दिले आहे. यामध्ये सीहंटर शिकारीसारखे कार्य करतात. ते समुद्रातील शत्रूंचा शोध घेणारे आणि त्यांचा नाश करणारे नौदलाचे अत्याधुनिक जवान किंवा यंत्रणा असते. समुद्राच्या पाण्यात, पाण्याखाली आणि आकाशातही सतत नजर ठेवतात आणि गरज पडल्यास अचूक कारवाई करतात.
शत्रूच्या कारवाईला उत्तर देण्यासाछी आम्ही अजूनही सज्ज : IN
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी (दि.१०) १०० तासांच्या स्थल, आकाश आणि समुद्रातील लष्करी कारवाईनंतर शस्त्रसंधीवर सहमती झाली होती. मात्र, त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी इस्लामाबादने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमा भागात गोळीबार केला. यानंतर भारतीय नौदलाने एक्स 'X' या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, "भारतीय नौदल समुद्रात विश्वासार्ह अटकावात्मक स्थितीत तैनात आहे. पाकिस्तान किंवा पाकिस्तानपुरस्कृत अतिरेक्यांकडून होणाऱ्या कोणत्याही शत्रुत्वपूर्ण कारवाईला निर्णायक उत्तर देण्यासाठी आम्ही अजूनही सज्ज आहोत".
नौदल लक्ष्यांवर अचूक प्रहार करण्यास सक्षम
भारतीय नौदलाने एक्स पोस्टमध्ये सांगितले आहे की, पहलगाम हल्ल्यानंतर अरबी समुद्रात विविध शस्त्रचाचण्या घेऊन युद्धनीती तपासली व त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. या प्रक्रियेत नौदलाच्या कर्मचाऱ्यांची, शस्त्रास्त्रांची, उपकरणांची आणि युद्धप्लॅटफॉर्म्सची कार्यक्षमता पुन्हा तपासली गेली आणि ते विशिष्ट लक्ष्यांवर अचूक प्रहार करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध झाले. दिवसाच्या सुरुवातीला नौदल संचालन महासंचालक व्हाइस अॅडमिरल ए. एन. प्रमोद यांनी सांगितले की, भारतीय नौदल अरबी समुद्राच्या उत्तरेकडील भागात आघाडीवर तैनात असून, अटकावात्मक आणि प्रतिकारक्षम स्थितीत आहे. गरज भासल्यास, समुद्रातील व जमीनवरील ठिकाणांवर (जसे की कराचीसह) ठराविक वेळी अचूक हल्ला करण्यासाठी नौदल पूर्णतः सज्ज आहे.

