

देशाच्या तंत्रज्ञान प्रगतीशी संबंधित महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारताने तंत्रज्ञान क्रांतीकडे आणखी एक पाऊल टाकण्यास सुरूवात केली आहे. भारताने 6G पेटंट दाखल करत जगातील टॉप ६ देशांमध्ये सामील होण्याचा मान पटकावला आहे.
भारत आता वेगाने 6G कडे वाटचाल करत असल्याचे दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी सांगितले. भारत 6G २०२५ परिषदेदरम्यान १११ हून अधिक संशोधन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, 6G पेटंट दाखल करण्याबाबत भारत आता पहिल्या 6 देशांमध्ये सामील झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
6G पेटंट दाखल करणाऱ्या जगातील टॉप ६ देशांमध्ये भारत देखील सामील झाला आहे. 6जी आल्यानंतर, इंटरनेट डेटा ट्रान्सफरचा वेग १ टेराबिट प्रति सेकंदापर्यंत पोहोचेल. हे 5G पेक्षा 100 पट वेगवान असेल. 6Gचा वेग 5G पेक्षा इतका जास्त असेल, तर तुमची अनेक कामे क्षणार्धात पूर्ण होतील. जसे की मोठ्या फाइल्स काही सेकंदातच डाउनलोड होतील. याशिवाय, इंटरनेट सर्फिंग करताना, व्हिडिओ पाहताना, व्हिडिओ कॉल करताना आणि OTT वर चित्रपट पाहताना तुम्हाला स्लो स्पीडची समस्या येणार नाही.
दूरसंचार राज्यमंत्र्यांनी सांगितले की, भारतात प्रतिभावान शास्त्रज्ञ आणि अभियंते आहेत ज्यामुळे भारत 6G तंत्रज्ञानात जागतिक नेता बनू शकतो. आमच्याकडे 6Gच्या संशोधन आणि नवोपक्रमासाठी पुरेसा वेळ आहे. 6जी तंत्रज्ञानामुळे केवळ विद्यमान उद्योगच नव्हे तर अनेक नवीन उद्योगही उदयास येतील.
एवढेच नाही तर, २०३५ पर्यंत 6G भारताच्या अर्थव्यवस्थेत १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची भर घालू शकते. 6G सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरू करता येईल? सध्या तरी याबाबत कोणतीही अचूक माहिती समोर आलेली नाही. सध्या भारतात, एकीकडे रिलायन्स जिओ, एअरटेल हे 5G सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवत आहेत, तर दुसरीकडे व्होडाफोन, आयडिया देखील 5G नेटवर्कचा वेगाने विस्तार करण्यात गुंतलेली आहे.
अहवालांनुसार, सध्या अमेरिका, चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपियन युनियन 6G तंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडीवर आहेत. भारतही या शर्यतीत वेगाने धावत आहे. भारत सरकार 6G तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संस्था आणि खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने काम करत आहे. ती संशोधन आणि विकास करत असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे आहे.
6G तंत्रज्ञानाच्या आगमनाने, देशभरातील मोबाइल नेटवर्कवरील इंटरनेटचा वेग सध्याच्या वेगापेक्षा १०० पट जास्त होईल. यामुळे नवीन उद्योगांना जन्म मिळेल आणि जुन्या उद्योगांमध्ये क्रांती येईल. 6G च्या आगमनामुळे 2035 पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेत १ ट्रिलियन डॉलर इतकी भर पडू शकते. 6G तंत्रज्ञान स्वदेशी असल्याचा फायदा असा होईल की, चिनी कंपन्यांची उपकरणे देशात येणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.