‘सिक्स जी’ नेटवर्कचे पडघम

सिक्स जीमध्ये इंटरनेट डेटाचा वेग एक टीबीपर्यंत असेल
 6G launch preparations underway
‘सिक्स जी’ नेटवर्कचे पडघमPudhari File Photo
Published on
Updated on
शहाजी शिंदे, संगणक प्रणाली तज्ज्ञ

माहिती-तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इंटरनेट सेवा हे सर्वांत आवश्यक असणारे साधन ठरले आहे. कोणत्याही संदेशाचे-माहितीचे-डेटाचे आदान-प्रदान करण्यासाठी इंटरनेटचा वेग हा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. त्यामुळे वेगवान गतीने डेटा उपलब्ध करणार्‍या तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी जगभरातील तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि सरकारे दिवस-रात्र काम करत आहेत. फाईव्ह जी नंतर आता सिक्स जीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सिक्स जीमध्ये इंटरनेट डेटाचा वेग एक टीबीपर्यंत असेल, असे सांगितले जात आहे. या अतिवेगवान इंटरनेट स्पीडमुळे अनेक बदल घडणार आहेत.

भारतात फाईव्ह जी नेटवर्कचा ओनामा झाला तेव्हापासूनच सिक्स जीची चर्चा सुरू झाली होती. देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी देशात सिक्स जी नेटवर्क आणण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले होते. जगातील अनेक देशांनी सिक्स जी इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. 2028 सालापर्यंत ग्राहकांना देशात 6जी नेटवर्क सेवा देण्याचे उद्दिष्ट दक्षिण कोरियन सरकारने ठेवले आहे. त्यानुसार स्थानिक कंपन्यांना 6जी नेटवर्कमध्ये वापरल्या जाणार्‍या वस्तूंचे उत्पादन करण्यास सांगितले आहे. कोरियाला 6जी सेवा देणारा जगातील पहिला देश बनायचा आहे. या प्रकल्पावर कोरियन सरकार 3,900 कोटी रुपयांहून अधिक खर्च करत आहे. अमेरिका, चीन, जपान हे देशही 6जी नेटवर्क प्रदान करण्यासाठी काम करत आहेत. अमेरिकेने यासाठी ‘नेक्स्ट जी अलायन्स’ सुरू केली आहे. या युतीमध्ये अ‍ॅपल, एटी अँड टी, क्वालकॉम, गुगल आणि सॅमसंग या कंपन्यांचा समावेश आहे. चीननेही 6जीसाठीचा आराखडा जाहीर केला आहे. देशभरात ‘फाईव्ह जी’ सेवा सुरू झाल्यानंतर दोन वर्षाच्या आतच भारतातही ‘सिक्स जी’ची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय दूरसंचार कंपन्यांनी पुढील तीन वर्षांत सर्व 6 जी पेटंटमध्ये 10 टक्के वाटा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दूरसंचार उद्योगातील कंपन्यांनी भारताच्या गरजेनुसार संशोधन करण्याचा आणि त्यासाठी एक मानक निश्चित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारतात सध्या फाईव्ह जी नेटवर्क रोलआउटची तयारी सुरू आहे. जिओ आणि एअरटेलने विक्रमी वेळेत देशातील सर्वाधिक जिल्ह्यांच्या ठिकाणी फाईव्ह जी नेटवर्क कार्यान्वित केले आहे. त्याचवेळी व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलदेखील फाईव्ह जी नेटवर्क ‘पॅन इंडिया’च्या पातळीवर लाँच करण्याच्या तयारीत आहेत. ‘फाईव्ह जी’मध्ये एक जीबीपीएसपर्यंत इंटरनेटचा स्पीड मिळतो आणि मागील श्रेणीच्या तुलनेत दहापट अधिक वेगवान आहे. फाईव्ह जी लाँच झाल्यानंतर जगभरात इंटरनेटमध्ये एकप्रकारे क्रांती घडली आहे. एआय, मशिन लर्निंग आदींचा काळ सुरू झाला आहे. फाईव्ह जीचे अ‍ॅडव्हान्स व्हर्जन आगामी काळात लाँच होईल आणि त्यानंतर कनेक्टिव्हिटी अधिक चांगली राहील.

‘सिक्स जी’ला सहाव्या जनरेशनमधील वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हटले जाते. एकीकडे फाईव्ह जीचा प्रमुख फोकस मोबाईल ब्रॉडबँड आणि एलओटी डिव्हाईस सुसज्ज करण्यावर राहिला; तर ‘सिक्स जी’च्या व्यवस्थेत वेगाच्या पातळीत आणखी सुधारणा होईल. यात मोबाईल इंटरनेट डेटाची स्पीड एक टीबीपीएसपर्यंत पोहोचेल आणि लेटन्सी 100 मायक्रोसेकंदपर्यंत पोचेल, असे सांगण्यात येते. डेटाच्या पॅकेटला एका पॉईंटपासून दुसर्‍या पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठी जो वेळ लागतो त्याला लेटन्सी म्हणतात. सिक्स जी आल्यानंतर तुम्ही-आम्ही रिअल टाईममध्ये कोणत्याही लॅगशिवाय जगाशी व्हर्च्युअली कनेक्ट होऊ शकू. ‘सिक्स जी’ तंत्रज्ञान हे सध्याच्या मेगाहर्टस किंवा गिगाहर्टस् स्पेक्ट्रम बँडवर काम करणार नाही. यासाठी नवीन टेट्राहर्ट्झ स्पेक्ट्रम बँड वापरण्यात येणार आहे. याशिवाय हे तंत्रज्ञान नव्या जनरेशनची टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटिलिजन्स (एआय) इंट्रिगेशनयुक्त असेल. शिवाय ‘फाईव्ह जी’च्या तुलनेत अधिक सुरक्षित असेल.

जगभरात ‘सिक्स जी’ टेक्नॉलॉजीवरून रिसर्च आणि डेव्हलपमेंट सुरू आहे. जपानमध्ये त्याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. भारत देखील या शर्यतीत मागे राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये ‘सिक्स जी’साठी टेस्ट बँड लाँच केलेले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ‘सिक्स जी’ लाँच करण्यात जगात आघाडी घेणार्‍या देशांत भारतही असेल, असा दावा केला. यामुळे 2030 पर्यंत भारतात ‘सिक्स जी’ची सेवा सुरू होऊ शकते. ही सेवा आल्यानंतर मोबाईल टेक्नॉलॉजीला नवीन उंची लाभेल. यात यूजरला इंटरनेट अ‍ॅक्सेस करण्यात झिरो लँटसी म्हणजेच कोणत्याही प्रकारचा लॅग मिळणार नाही. या काळात सिमलेस कनेक्टिव्हिटी मिळेल आणि तुम्ही-आम्ही कोणत्याही नेटवर्क डिस्कशनच्या जगात व्हर्च्युअली कनेक्टेड राहू शकतो. स्मार्ट सिटी आणि उद्योगासाठी हे तंत्रज्ञान वरदान सिद्ध होईल.

भारताने ‘सिक्स जी’साठी आतापासून संशोधन आणि विकास कार्यक्रम राबविण्यास सुरू केला आहे. दूरसंचार विभागाने ‘सिक्स जी’ टेक्नॉलॉजी इनोव्हेशन ग्रुपची स्थापना केली आहे. या माध्यमातून भारतातील ‘सिक्स जी’च्या शक्यता शोधल्या जातील. यासाठी दूरसंचार विभागाने अ‍ॅकॅडेमिक्स, इंडस्ट्री आणि गव्हर्मेंट बाँडीचे सहकार्य घेतले आहे. या आधारावर भारत ‘सिक्स जी’ टेक्नॉलॉजीला डेव्हलप केले जाईल. उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, ‘फाईव्ह जी’ प्रमाणेच ‘सिक्स जी’ची अंमलबजावणी करणे सोपे नाही. स्पेक्ट्रम वाटपावरून अनेक आव्हाने तयार होऊ शकतात. कारण सरकारला ‘सिक्स जी’ सेवेवरून नवीन टेट्राहर्टस् स्पेक्ट्रम बँड प्रदान करावा लागणार आहे. हा एकप्रकारे उच्च प्रतीचा फ्रिक्वेन्सी बँड आहे आणि त्याची बँडविड्थ अधिक आहे. या बँडवर अधिक क्षमतेवर आधारित हायस्पिड कनेक्टिव्हिटी मिळेल. ‘सिक्स जी’ इव्होल्युशनसाठी व्यापक प्रमाणात पायाभूत सुविधा अपग्रेड करण्याची गरज भासणार आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सना व्यापक प्रमाणात स्मॉल सेल डिप्लॉयमेंट, एज कॉम्प्युटिंग कॅपेबिलिटीज आणि ‘अ‍ॅडव्हान्स अँटिना टेक्नॉलॉजी’साठी मोठी गुंतवणूक करावी लागेल. सरकारने यासाठी नॅशनल ब्रॉडबँड मिशन डिजिटल इंडिया प्रोग्रॅमची घोषणा केलेली आहे. या दोन्ही गोष्टी ‘सिक्स जी’ अंमलात आणणार्‍या आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.

आयआयटी (बनारस) मधील इंडिया सिक्स जीचे महासंचालक राजेश कुमार पाठक यांनी यासंबंधी अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार सिक्स जीसाठी गावे किंवा शहरात मोठे टॉवर उभे केले जाणार नाहीत. त्यासाठी शहरापासून गावापर्यंत विजेच्या खांबांवर त्याचे शेल्स बसवले जाणार आहेत. हे शेल्स पूर्णपणे सेन्सर बेसवर काम करतील. त्यांचे वजनही सुमारे 8 किलो इतके असेल. राजेशकुमार यांच्या मते, 2030 पर्यंत भारतात सिक्स जी लाँच होईल आणि ही अत्याधुनिक सेवा लाँच करण्याबाबत भारत जगातील आघाडीच्या देशांमध्ये असेल. यासाठी आयटी तज्ज्ञांकडून सातत्याने विचारमंथन आणि संशोधन सुरू आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सिक्स जीसाठी बसवण्यात येणारे शेल्स हे आरोग्यासाठीही हानिकारक असणार नाहीत. 6 जी नेटवर्कमध्येही सॅटेलाईट नेटवर्कचा वापर केला जाणार आहे. याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने लोक एकमेकांशी बोलू शकतील. मोबाईल फोनची बॅटरी 6 जी नेटवर्कमध्ये अधिक बॅकअप देखील देईल. कारण हे नेटवर्क पूर्णपणे सेन्सर आधारित असेल. जेव्हा तुम्ही डिव्हाईसवर कोणतेही काम कराल तेव्हाच ते सक्रिय राहील, अन्यथा ते स्लीप मोडमध्ये जाईल. भारतात सद्य:स्थितीत 13 कोटींहून अधिक लोक फाईव्ह जीचा वापर करत आहेत. सिक्स जी सेवा प्रत्यक्षात अवतरेल तेव्हा ही संख्या आणखी वाढणार आहे. अतिगतिमान इंटरनेट सेवा मोबाईल आणि संगणकावर उपलब्ध झाल्यामुळे अनेक सोयी-सुविधांचा वेग वाढण्याबरोबरच त्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही वाढत जाईल. असे मानले जाते की, 6 जी च्या आगमनाने, लोक रिअल टाईम होलोग्राफिक संभाषण करू शकतील. व्हर्च्युअल आणि मिक्स रिअ‍ॅलिटीच्या जगात लोकांना नवीन अनुभव मिळतील.

उद्याच्या भविष्यात इंटरनेट याहून अधिक गतिमान होईल. पण यामुळे सद्य:स्थितीत असणारे प्रश्न बिकट होत जातील का, याचाही विचार करावा लागेल. आज मोबाईलच्या अतिवापरामुळे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आयुष्यात अनेक प्रश्न उद्भवत असून दिवसागणिक ते गंभीर होत चालले आहेत. एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, 12 वर्षांपर्यंतची कमीत कमी 42 टक्के मुले दिवसातून दोन ते चार तास आपल्या मोबाईलला चिकटलेली असतात. तर याहून जास्त वयाची मुले दररोज आपला 47 टक्के वेळ मोबाईल पाहण्यातच घालवतात. या सर्वेक्षणानुसार ज्या घरांमध्ये अनेक उपकरणे असतात, तिथे मुलांना स्क्रीनपासून दूर करणं आणि त्यांना आक्षेपार्ह माहितीपासून लांब ठेवणे आव्हानात्मक असतं. या सर्वेक्षणानुसार 12 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 69 टक्के मुलांजवळ स्वतःचा मोबाईल किंवा टॅबलेट आहे, ज्याच्या माध्यमातून ते कोणत्याही अडथळ्याशिवाय काहीही बघू शकतात. अशा स्थितीत उद्या सिक्स जीचे अतिवेगवान इंटरनेट आल्यानंतर काय स्थिती उद्भवेल याचा विचार सर्वांनीच करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news