1 August Rule Changes
दिल्ली : जुलै महिना संपत आला असून, आणखी ५ दिवसांनी ऑगस्ट महिन्याची सुरुवात होणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे, ऑगस्टच्या पहिल्या तारखेपासून देशात काही महत्वाचे बदल लागू होतील. या बदलांमध्ये घरातील स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीपासून ते सर्वात महत्वाच्या युपीआय पेमेंटच्या नियमांचा समावेश आहे. GPay, PhonePe, आणि Paytm सारख्या UPI अॅप्सचा वापर करणाऱ्यांसाठी १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणारे नवीन नियम महत्त्वाचे असतील.
UPI आता केवळ एक तांत्रिक सुविधा राहिलेली नाही, तर ती भारताच्या डिजिटल जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI प्रणाली अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी काही नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नियम अशा कृतींवर मर्यादा घालतील ज्या UPI सिस्टीमवर अतिरिक्त ताण निर्माण करतात. उदाहरणार्थ, वारंवार बॅलन्स तपासणे किंवा व्यवहाराचा स्टेटस पुन्हा पुन्हा तपासणे.
आता तुम्ही दिवसातून केवळ ५० वेळा बँक खात्याचा बॅलन्स तपासू शकता.
तुमच्या मोबाइल नंबरशी लिंक असलेल्या बँक खात्यांची माहिती दिवसात जास्तीत जास्त २५ वेळा पाहता येईल.
एका व्यवहाराचा स्टेटस फक्त ३ वेळा तपासता येईल आणि प्रत्येक वेळेस किमान ९० सेकंदांचं अंतर असणं आवश्यक असेल.
Netflix, EMI किंवा वीजबिल यांसारखे Auto Payment व्यवहार ठरलेल्या वेळेनुसारच प्रक्रिया होतील.
NPCI च्या मते, एप्रिल आणि मे २०२५ दरम्यान UPI प्रणालीवर प्रचंड ताण निर्माण झाला होता, ज्यामुळे अनेक व्यवहार अयशस्वी झाले किंवा उशीराने पूर्ण झाले. यामागचं मुख्य कारण म्हणजे वापरकर्त्यांनी वारंवार बॅलन्स किंवा ट्रांजॅक्शन स्टेटस तपासणं. त्यामुळे हा ताण कमी करण्यासाठीच हे नवीन नियम आणले जात आहेत.
जे व्यापारी AutoPay च्या माध्यमातून पेमेंट घेतात, त्यांना NPCI च्या नवीन टाइम स्लॉट्सनुसार त्यांच्या सिस्टीममध्ये बदल करावा लागू शकतो. परंतु सामान्य ग्राहकांसाठी, मोबाईल रिचार्ज किंवा सबस्क्रिप्शन सारख्या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशातील जनतेचे लक्ष तेल विपणन कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये केल्या जाणाऱ्या बदलांकडे लागलेले असते, कारण हे थेट स्वयंपाकघराच्या बजेटशी संबंधित आहे. गेल्या जुलै महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची कपात केली होती. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती बऱ्याच महिन्यांपासून स्थिर आहेत. त्यामुळे त्यांच्या दरात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.