स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण India @ 75 अभियानात स्वातंत्र्य चळवळीतील अशा एका महत्त्वाच्या घटनेबद्दल वाचणार आहोत. ज्या घटनेमुळे एका महिला डॉक्टरचे आयुष्य संपूर्ण बदलले आणि आझाद हिंद सेनेमध्ये 'राणी झांसी रेजिमेंट' अस्तित्वात आली.
दुस-या महायुद्धाला सुरुवात झाली होती. इंग्रजी सैन्यात दाखल असलेले भारतीय सैनिक इंग्रजांकडून लढत होते. या काळात डॉक्टर आणि नर्सेस यांची भूमिका खूप महत्वाची होती. ब्रिटिशांनी महिला डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात भरती करत हाेते. त्याचवेळी नुकतेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर लक्ष्मी स्वामिनाथन यांना मात्र, जे ब्रिटीश आपल्या लोकांची गळचेपी करत आहेत. त्यांच्या सैन्यात आपण भरती व्हायचे नाही, असा निर्धार केला. त्यामुळे त्यांनी थेट सिंगापूर गाठले. तिथे दक्षिण भारतीय, मलेशिया आणि अन्य प्रदेशातील अनेक मजूर रबरच्या बागांमध्ये कार्यरत होते. दुस-या महायुद्धात रबरला खूप महत्त्व आले हाेते. इंग्रजांकडून मजुरांचे हाल मोठ्या प्रमाणात सुरु हाेते. त्यांना सातत्याने कोणते ना कोणते आजार होत असत. डॉ. लक्ष्मी यांनी त्यांच्यासाठी मोफत दवाखाना सुरू केला.
या दरम्यान जपानने सिंगापूरवर आक्रमण केले या युद्धात ब्रिटीशांची पिछेहाट होत असताना मरण्यासाठी ब्रिटिश अधिकारी भारतीय सैन्यांना पुढे करत असत. यामुळे भारतीय सैन्यात असंतोष वाढत होता. तर जपानदेखिल हेलिकॉप्टरमधून परच्या खाली सोडायचे ज्यात लिहिलेले असायचे तुम्ही भारतीय सैनिक इंग्रजांसाठी का लढत आहात. तुम्ही युद्धातून बाजूला होऊन स्वतःची सेना बनवा आम्ही तुम्हाला मदत करू. तर याच वेळी रासबिहारी बोस ही स्वतंत्र भारतीय सेना बनवण्याच्या तयारीत होते. त्यांनी जपानकडे कैद असलेल्या जवळपास 40000 भारतीय कैद्यांना एकत्र करून त्यांची फौज बनवली.
दुसरीकडे जर्मनीमध्ये मदतीच्या अपेक्षेने गेलेल्या नेताजी बोस यांना हिटलरकडून निराशाजनक अनुभव आल्याने त्यांनी जपानला जाण्याचा निर्णय घेतला. रासबिहारी बोस यांनी नेताजींना आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित केले होते. आझाद हिंद फौजेची कमान नेताजींच्या हाती आल्यानंतर ते दोन जुलै 1943 मध्ये सिंगापूरमध्ये आले होते. लहानपणापासूनच लक्ष्मीवर नेताजींच्या वेगळ्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव होता. सिंगापूरमध्ये नेताजींची त्यांनी भेट घेतली.
हीच ती भेट ज्याच्यातून साकारली आझाद हिंद सेनेची राणी झांसी रेजिमेंट. नेताजी या डॉक्टर लक्ष्मी यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले. दोघांमध्ये जवळपास 5 तास चर्चा झाली. या चर्चेनंतर त्यांनी लक्ष्मी यांना आझाद हिंद सेनेत भरती करून घेतले. तीन महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर डॉक्टर लक्ष्मी या कॅप्टन लक्ष्मी बनल्या. नेताजींनी त्यांच्यावर महिलांना फौजेत भरती करून घेणे आणि त्यांना प्रशिक्षित करणे ही जबाबदारी दिली. जी लक्ष्मी यांनी चोख बजावली. पुढे बर्मामध्ये राणी झांसी रेजिमेंटने आपल्या अद्भूत साहस आणि धैर्याचे प्रदर्शन केले. कॅप्टन लक्ष्मी यांना नंतर कर्नल हे पदही देण्यात आले. त्या संपूर्ण आशिया खंडातील पहिल्या महिला कर्नल होत्या. पण त्या कॅप्टन लक्ष्मी या नावानेच प्रसिद्ध झाल्या.