India @75 : गांधीजी म्हणाले, सरदार नसते तर... | पुढारी

India @75 : गांधीजी म्हणाले, सरदार नसते तर...

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात विविध चळवळी, सत्याग्रह, क्रांतिकारी घटना यांचे फार मोठे योगदान आहे. यातील एक ठळक आंदोलन म्हणजे गुजरातमधील खेडा जिल्ह्यात १९१८साली झालेले शेतसारा विरोधातील लढा होय. अहिंसक आणि सत्याग्रहाच्या मार्गाने लढा यशस्वी होऊ शकतो, हे या आंदोलनाने प्रस्थापित केले. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांचे नेतृत्व याच लढ्यातून पुढे आले होते.

१९१८ला खेडा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. याचा फटका जवळपास सर्वच गावांना बसला होता. जर पीक २५ टक्केपेक्षा कमी निघाले तर कायद्याने शेतसारा माफ केला जात होता. ही परिस्थिती सर्वंच गावांत होती. पण ब्रिटिश सरकारने फक्त १०३ गावांतील शेतसारा माफ केला आणि उरलेल्या ५०० गावांना शेतसारा भरण्याचे आदेश दिले.

शेतकऱ्यांनी याचा निषेध केला, पण शेतकऱ्यांचे ऐकणार कोण? शेवटी शेतकऱ्यांनी वल्लभभाई पटेल यांच्याकडे धाव घेतली. वल्लभाई पटेल यांचे सरकार दरबारी वजन होते. वल्लभाई पटेल यांनी अतिवृष्टीग्रस्त गावांचा दौरा केला. झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी महात्मा गांधीजींना कळवली. गांधीजींनी शेतकऱ्यांनी निःशस्त्र प्रतिकार करण्याचे आवाहन केले. लोक लढायला तयार झाले.

पटेल यांनी कमिशनरला पत्र लिहून शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले असून स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र लिहिले. हे एक प्रकारे ब्रिटिश व्यवस्थेला दिलेले आव्हानच होते. त्यामुळे कमिशनरनी सक्तीने कर वसूल केले जाईल, अशी धमकीच दिली.

महात्मा गांधीजींनी याविरोधात लढ्याची घोषणा केली. त्यांनी या लढ्यात कुणी तरी सहकारी हवा होता. वल्लभभाई पटेल यांनी ही जबाबदारी घेतली. वल्लभभाई पटेल यांनी विलायती कपडे फेकून देत, धोतर आणि सदरा असा वेष स्वीकारला. गावोगावी फिरून त्यांनी शेतकऱ्यांची एकजूट केली. लोकांना समजेल अशा साध्यासोप्या भाषेत ते त्यांच्याशी संवाद साधत.

सरकारही या आंदोलनाविरोधात बिथरले होते. त्यांनी शेतकऱ्यांना दंडासह कर भरण्याच्या नोटिसा काढल्या. पण शेतकऱ्यांनी या नोटिसांना जुमानले नाही. सरकारने जमिनी जप्त करण्याच्या नोटिसा काढल्या. सरकारचा हा आदेश मोडण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात काम करायला सुरुवात केली. बऱ्याच शेतकऱ्यांची गुरे आणि जमिनी सरकारने लिलावात काढल्या. पण लढा सुरूच राहिला.

सरकारने गांधीजीच्या विरोधात चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्नही केला. पण लढा सुरूच राहिला. गांधीजी गुजरातमध्ये नसताना आंदोलनाची सारी भिस्त पटेल यांच्यावर होती.

शेवटी जून महिना उजाडला. शेतकरी लढ्यातून माघार घेत नव्हते. अखेर सरकारने आदेश काढला की ज्यांना शक्य आहे त्यांनी शेतसारा भरावा.

अशा प्रकारे सत्याग्रह आणि अंहिसा या मार्गाने शेतकऱ्यांचे आंदोलन यशस्वी झाले.

या संदर्भात गांधीजी म्हणाले होते, “जर, त्यांचा (वल्लभभाई पटेल) पुढाकार नसता तर हा लढा इतका आमूलाग्र यशस्वी झाला नसता, हे मला मान्य केलेच पाहिजे.”


संदर्भ

पोलादी पुरुष सरदार वल्लभाई पटेल – लेखक : केवल एल पंजाबी, अनुवाद – विश्वास भोपटकर

Back to top button