India @ 75 : "अविश्रांत श्रम करा, सत्तेपासून सावध रहा...'' : स्वातंत्र्य दिनी महात्‍मा गांधींनी दिला हाेता विशेष संदेश | पुढारी

India @ 75 : "अविश्रांत श्रम करा, सत्तेपासून सावध रहा...'' : स्वातंत्र्य दिनी महात्‍मा गांधींनी दिला हाेता विशेष संदेश

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : “आजपासून तुम्‍हाला काटेरी मुकुट घालावा लागेल. अविश्रांत श्रम करा, नम्र व्‍हा, क्षमाशील व्‍हा, सत्तेपासून सावध रहा. सत्ता भ्रष्‍ट करते. डामडौल व भपक्‍याने तुम्‍ही सापळ्यात सापडू नका”, असा संदेश महात्‍मा गांधी यांनी स्वातंत्र्य दिनी बंगालमधील मंत्रीमंडळाला दिला हाेता. या घटनेचे विवेचन लेखक राजा मंगळवेढेकर यांच्‍या ‘स्‍वतंत्र झाला माझा भारत’ या पुस्‍तकात केले आहे.

१५ ऑगस्‍ट १९४७ हा दिवस आधुनिक भारताच्‍या इतिहासातील सुवर्णदिन. शेकडो वर्षांच्‍या गुलामगिरीच्‍या जोखडातून देश मुक्‍त झाला. संपूर्ण देश स्वातंत्र्याचा जयघोष करत असताना महात्‍मा गांधी हे कलकत्‍यामध्‍ये होते. एकीकडे देश स्वातंत्र्याचे गीत गात होता. या धामधुमीत राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी फाळणींच्‍या महायातना सहन करणार्‍या संकटग्रस्‍तांचे अश्रू पुसत होते. नोआखलीच्‍या (आता बांगलादेशात ) रस्‍त्‍यावर संकटग्रस्‍तांना मदत करण्‍यात महात्‍मा गांधी व्‍यस्‍त होते. महात्‍मा गांधी कोलकातामधील संकटग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी रस्‍त्‍यावर उतरले आहेत, अशी माहिती बंगालच्‍या मंत्रीमंडळातील सदस्‍यांना मिळाली.

लक्षावधी खेड्यांची सेवा करण्‍याकरिताच तुम्‍ही सत्ता घेतली आहे

सर्व मंत्री महात्‍मा गांधी यांच्‍याकडे आशीर्वादासाठी गेले. यावेळी महात्‍मा गांधी म्‍हणाले होते की, “आजपासून तुम्‍हाला काटेरी मुकुट घालावा लागेल. अविश्रांत श्रम करा, नम्र व्‍हा, क्षमाशील व्‍हा, सत्तेपासून सावध रहा. सत्ता भ्रष्‍ट करते. डामडौल व भपक्‍याने तुम्‍ही सापळ्यात सापडू नका. भारतातील लक्षावधी खेड्यांची सेवा करण्‍याकरिताच तुम्‍ही सत्ता घेतली आहे, हे लक्षात ठेवा, परमेश्‍वर तुम्‍हांला साहाय्‍य करो ” . त्‍यावेळी महात्‍मा गांधी यांनी दिलेला संदेश हा आजच्‍या पिढीलाही मार्गदर्शक आहे.

या दिवशी संध्‍याकाळी गांधीजींच्‍या प्रार्थनेला अलोट जनसमुदाय लोटला होता. रात्री शहरातील दीपोत्‍सवी स्वातंत्र्य सोहळा पाहण्‍यास गांधीजी गेले होते. एके ठिकाणी मुस्‍लिम बांधावांनी त्‍यांना पाहिले, त्‍यांना थांबावले. त्‍यांच्‍यावर फुले उधळली. गुलाबपाणी शिंपले, जयजयकार केला. स्वातंत्र्याचा जयजयकार केला. यामध्‍ये गाधींजीही सहभागी झाले, असेही या पुस्‍तकात नमूद करण्‍यात आले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button