

दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये २६ पर्यटक मारले गेले. दरम्यान भारत दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या विविध स्तरावर मुसक्या आवळत आहे. आता देखील भारताने पाकविरोधात आणखी एक पाऊल उचलत जागतिक स्तरावर पाकिस्तानची गळचेपी करण्याची मागणी केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानविरुद्ध दंडात्मक उपाययोजना कडक केल्या आहेत, असे सरकारी सूत्रांनी सोमवारी सांगितले. भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) अध्यक्षांची भेट घेतली. त्यांनी पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या निधीत कपात करण्याची मागणी केल्याचे वृत्त समोर आले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मासातो कांडा यांच्याशी झालेल्या भेटीव्यतिरिक्त, अर्थमंत्र्यांनी इटलीचे अर्थमंत्री जियानकार्लो जियोर्जेट्टी यांचीही भेट घेतली. यावेळी देखील अर्थमंत्र्यांनी याच मागणीचा पुनरुच्चार केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था यापूर्वीच डबघाईला आली आहे. तो फिलीपिन्सस्थित प्रादेशिक विकास बँकेच्या निधीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. जी बँक हवामान बदलापासून ते आर्थिक पायाभूत सुविधांपर्यंत विविध क्षेत्रांना समर्थन देते, तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) देखील पाकिस्तानला मदत मिळते. दरम्यान इस्लामाबादला ADB निधी रोखण्याचा नवी दिल्लीचा निर्णय हा सीमापार दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी आणि शेजारील देशात दहशतवाद्यांना होणारा निधी रोखण्यासाठी त्याच्या व्यापक आर्थिक धोरणाचा एक भाग आहे.