

India UAE LPG oil deal
अबुधाबी : अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे संपूर्ण जगाला ऊर्जा संकटाची झळ बसत आहे. या युद्धाचा परिणाम कमी करण्यासाठी भारताने संयुक्त अरब अमिरातीसोबत (UAE) लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) पुरवठ्याबाबत एक धोरणात्मक करार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युएईच्या अवघ्या दोन तासांच्या संक्षिप्त दौऱ्यात या करारावर स्वाक्षरी झाली.भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा एलपीजी आयातदार देश असून, जागतिक तणावाच्या परिस्थितीत पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
एलपीजी, दोन्ही देशांनी धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याबाबत एका सामंजस्य करारासह संरक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि बँकिंग क्षेत्रात मोठे करार आणि गुंतवणुकीच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. भारत आणि युएई दरम्यान 'स्ट्रॅटेजिक डिफेन्स पार्टनरशिप' (धोरणात्मक संरक्षण भागीदारी) च्या फ्रेमवर्कवर करार स्वाक्षरी करण्यात आला, ज्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय धोरणात्मक आणि सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत होणार आहे. एका मोठ्या गुंतवणुकीच्या घोषणेअंतर्गत, भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रासह RBL बँक आणि सामन कॅपिटल (Samman Capital) मध्ये तब्बल ५ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली.
पंतप्रधान मोदी भारत-नॉर्डिक शिखर परिषदेलाजात असताना अबुधाबी येथे काही वेळ थांबले होते. या संक्षिप्त थांब्यादरम्यान हे महत्त्वाचे करार करण्यात आले. पश्चिम आशियातील सध्याच्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर, मोदींनी आपल्या या भेटीत युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. याशिवाय, भारत आणि युएई दरम्यान दोन्ही देशांमधील धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या चौकटीबाबत एक करार आणि गुजरातच्या वाडिनार येथे 'शिप रिपेअर क्लस्टर' (जहाज दुरुस्ती केंद्र) उभारण्याबाबतच्या सामंजस्य करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते २० मे दरम्यानच्या आपल्या पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी अबू धाबी संक्षिप्त दौन्रांनत नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, नाविन्यता (Innovation) आणि हरित विकास (Green Growth) या क्षेत्रांमधील भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करणे, तसेच युरोप आणि आखाती देशांसोबत नवी दिल्लीचे वाढते संबंध अधिक मजबूत करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.
मोदींनी देशाला केलेल्या आवाहनानंतर काही दिवसांतच, आज भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रतिलीटर ३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. स्थानिक करांमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये या किमती वेगवेगळ्या असू शकतात. इंधनाच्या दरात झालेली ही वाढ अचानक झालेली नाही, कारण पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यापूर्वीच अशा प्रकारची दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले होते.