

India Semiconductor Mission
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी (दि.१४) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. उत्तर प्रदेशातील जेवर येथे देशातील सहावे सेमीकंडक्टर युनिट उभारण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे २ हजार नोकऱ्या निर्माण होतील, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत आणखी एक सेमीकंडक्टर युनिट उभारले जाईल. पाच सेमीकंडक्टर युनिट्स उभारण्याचे काम प्रगती पथावर आहे. आता सहावे युनिट उभारले जाणार आहे. आज मंजुरी देण्यात आलेले युनिट हे एचसीएल आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या उपक्रम आहे. एचसीएलकडे हार्डवेअर विकसित आणि निर्मिती करण्याचा दीर्घ अनुभव आहे. तर फॉक्सकॉन ही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील जगातील प्रमुख कंपनी आहे. या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण (YEIDA) मध्ये जेवर विमानतळाजवळ एक प्लांट उभारतील, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.
या युनिटचे उत्पादन २०२७ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
या प्लांटमध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, ऑटोमोबाईल्स, पीसी आणि डिस्प्ले असलेल्या इतर डिव्हायसेससाठी डिस्प्ले ड्रायव्हर चिप्स तयार केल्या जाणार आहेत. तर नवीन सेमीकंडक्टर युनिटमध्ये ३,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.
देशातील पहिला सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट २०२४ मध्ये अमेरिकेच्या सहकार्याने लाँच करण्यात आला होता. जो मिलिटरी ॲप्लिकेशन्स आणि महत्त्वाच्या टेलिकम्युनिकेशन्सच्या चिप्स तयार करण्यासाठी डिझाइन केलेला होता. या उपक्रमाला इंडिया सेमीकंडक्टर मिशनचे पाठबळ देण्यात आले आहे. त्यात भारत सेमी, 3rdiTech आणि यूएस स्पेस फोर्स यांच्यातील धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारीचा समावेश आहे.