

India Pakistan Ceasefire Agreement
भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाला शनिवारी विराम लागला. दोन्ही देशांनी जमीन, हवा अथवा कोणत्याही प्रकारे हल्ले करणार नाही, यावर सहमती दर्शवली. शनिवारी ५ वाजतापासून याची अंमलबजावणी करण्यात आली, असे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या परिस्थितीला विराम देण्यासाठी अमेरिकेने महत्वाची भूमिका बजावली. तसेच सौदी अरेबियासह इतर अनेक देशांनी भारत आणि पाकला संघर्ष थांबवण्यास विनंती केली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
त्यानंतर भारत-पाकिस्तान शस्त्रबंदी करारानंतर कमोडोर रघू आर नायर, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची पोलखोल केली.
कमोडोर रघू आर नायर म्हणाले, "आम्ही भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल मातृभूमीच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज, सतर्क आणि वचनबद्ध आहोत. पाकिस्तानच्या प्रत्येक चुकीच्या कृतीला ताकदीने प्रत्युत्तर दिले. भविष्यात कोणतीही आगळीक केली तर निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल. देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही कारवाईसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत."
सोफिया कुरेशी म्हणाल्या, ''पाकिस्तानने असा दावा केला की त्यांनी त्यांच्या जेएफ १७ ने आमच्या एस४०० आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र तळाचे नुकसान केले. हा त्यांचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. दुसरे म्हणजे त्यांनी, सिरसा, जम्मू, पठाणकोट, भठिंडा, नालिया आणि भूज येथील आमच्या हवाई तळांचे नुकसान केल्याची चुकीची माहितीही पसरवली. त्यांचा हा दावादेखील पूर्णपणे चुकीचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे, पाकिस्तानने अशीही चुकीची माहिती पसरवली की, चंदीगड आणि व्यास येथील आमच्या दारूगोळा डेपोचे नुकसान केले. हे त्यांचे दावे खोटे निघाले. भारतीय सैन्याने मशिदींचे नुकसान केल्याचा खोटा आरोपही पाकिस्तानने केला. याबाबत मी हे स्पष्ट करू इच्छिते की भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आपले सैन्य हे भारताच्या संवैधानिक मूल्याचे एक अतिशय सुंदर प्रतिबिंब आहे."
विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या, "आमची कारवाई केवळ भारतविरोधी कारवायांसाठी वापरल्या जाणाऱ्या दहशतवादी अड्डे आणि सुविधांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने होती. भारतीय सशस्त्र दलांनी कोणत्याही धार्मिक स्थळांना लक्ष्य केलेले नाही." असे त्यांनी स्पष्ट केले.
"गेल्या काही दिवसांत, आमच्या ठिकाणांवर विनाकारण हल्ला केल्यानंतर पाकिस्तानला त्याची किमत मोजावी लागली. त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यांचे जमीन आणि हवेत दोन्ही ठिकाणी नुकसान झाले. स्कार्दू, जेकबाबाद आणि भोलारी या महत्त्वाच्या पाकिस्तानी हवाई तळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याव्यतिरिक्त, त्यांच्या एडी शस्त्र प्रणाली आणि रडारचे नुकसान झाल्याने पाकिस्तानला त्यांच्या हवाई क्षेत्राचे संरक्षण करणे अशक्य झाले. त्यांची बचावात्मक आणि आक्रमक क्षमता पूर्णपणे ढासळली."