

India Pakistan Ceasefire Agreement
नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाला शनिवारी विराम लागला. दोन्ही देशांनी जमीन, हवा किंवा कोणत्याही प्रकारे हल्ले करणार नाही, यावर सहमती दर्शवली आहे. शनिवारी ५ वाजतापासून याची अंमलबजावणी करण्यात आली, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या परिस्थितीला विराम देण्यासाठी अमेरिकेने महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच सौदी अरेबियासह इतर अनेक देशांनी भारत आणि पाकला संघर्ष थांबवण्यास विनंती केली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी म्हणाले की, पाकिस्तानच्या लष्करी कारवायांचे महासंचालकांनी (डीजीएमओ) आज (शनिवारी) दुपारी ३:३५ वाजता भारतीय डीजीएमओंना फोनवरुन संपर्क केला. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५:०० वाजल्यापासून दोन्ही बाजूंनी जमीन, हवाई आणि समुद्रातून हल्ले केले जाणार नाहीत. गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली असल्याचे ते म्हणाले. दोन्ही देशांनी या कराराची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लष्करी कारवायांचे महासंचालक १२ मे रोजी दुपारी १२:०० वाजता पुन्हा बोलतील, असे ते म्हणाले. दरम्यान, भारताने ही घोषणा करण्याच्या अगोदरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट करुन यासंबंधी जगाला माहिती दिली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट करुन घोषणा केली की, दोन्ही देशांनी "पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदी" वर सहमती दर्शविली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा करून, ट्रम्प यांनी संकट कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमत झाले आहेत. सामान्य ज्ञान आणि उत्तम बुद्धिमत्ता वापरल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन, असे ते म्हणाले.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, भारत आणि पाकिस्तानने गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत सामंजस्य दाखवले आहे. भारताने सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि तडजोड न करणारी भूमिका कायम ठेवली आहे. भारत दहशतवादाविरोधात कायम ठाम भूमिका घेत राहील, असे जयशंकर म्हणाले.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो गेल्या ४८ तासांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासह वरिष्ठ भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संपर्कात होते, असे अमेरिकेने म्हटले आहे. संघर्षावर संवाद साधण्याचा पर्याय निवडण्यात शहाणपणा, विवेक दाखवल्याबद्दल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी पंतप्रधान मोदी आणि शरीफ यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले की, गेल्या ४८ तासांत, उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि असीम मलिक यांच्यासह वरिष्ठ भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. भारत आणि पाकिस्तान सरकारांनी तात्काळ युद्धबंदी करण्यास आणि तटस्थ ठिकाणी विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. हे जाहीर करताना मला आनंद होत आहे, असे ते म्हणाले.