Packaged Drinking Water Testing : बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची देशव्यापी तपासणी मोहीम सुरू, 'FSSAI'चा मोठा निर्णय

Bisleri Case : बिसलेरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कारवाई : दोन महिन्यांत प्रयोगशाळेचा अहवाल अपेक्षित
Packaged Drinking Water Testing Bisleri Case
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची देशव्यापी तपासणी मोहीम सुरू केली आहे. देशभरातून पाण्याचे नमुने गोळा करण्यास सुरुवात झाली असून, प्रयोगशाळेतील चाचण्यांचे अहवाल येण्यास किमान एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजित पुन्हानी यांनी बुधवारी दिली.

'सीआयआय'च्या एका कार्यक्रमानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हानी यांनी सांगितले की, ही मोहीम कोणत्याही विशिष्ट घटनेमुळे सुरू केलेली नाही. गेल्या वर्षभरात आम्ही दूध, मांस, अंडी, तृणधान्ये, एनर्जी ड्रिंक्स आणि साखरयुक्त पेये यांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली आहे. आता बाटलीबंद पाणी या नियमित प्रक्रियेचा भाग आहे. भारत हा मोठा देश असल्याने संपूर्ण अहवाल येण्यास एक-दोन महिने लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वीच 'एफएसएसएआय'ने 'बिसलेरी इंटरनॅशनल'च्या पाण्याचा नमुना असुरक्षित आढळल्याने कंपनीविरुद्ध खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीच्या आवारातून घेतलेल्या नमुन्यात 'ब्रोमेट'चे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले होते.

कंपनीच्या अपिलानंतर 'रेफरल' प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीतही पाण्यात 'पॉलिन्यूक्लियर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स' आढळल्याने ते असुरक्षित घोषित करण्यात आले. बिसलेरीविरुद्ध कायदेशीर कारवाई ही एक नियमित प्रक्रिया असून ती वेळेत होईल, असे पुन्हानी म्हणाले. दरम्यान, आपले पाणी पिण्यास सुरक्षित असून प्राधिकरणाला पूर्ण सहकार्य करू, असे स्पष्टीकरण बिसलेरीने दिले आहे.

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरही करडी नजर

अन्नपदार्थांसाठी वापरले जाणारे पॅकेजिंग साहित्य 'फूड ग्रेड' दर्जाचे आहे की नाही, याचीही लवकरच तपासणी केली जाईल, असे पुन्हानी यांनी सांगितले. यासोबतच उत्पादनांच्या लेबलवरील चुकीचे दावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरुद्धही प्राधिकरणाची कडक कारवाई सुरू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा सूत्रांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.