

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ क्षेत्रात जागतिक नैपुण्य, कंपन्या आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची क्षमता आहे. जग अंतराळ क्षेत्रातील कोणत्याही बाबीचा विचार करेल, त्यावेळी सर्वप्रथम भारताचे नाव समोर यावे, अशी व्यवस्था आणि वातावरण देशात निर्माण करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापकांशी शुक्रवारी सेवा तीर्थ येथे झालेल्या संवादावेळी ते बोलत होते.
भारताने अंतराळ क्षेत्रात खासगी सहभागासाठी दारे खुली केल्यानंतर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. भारतीय खासगी अंतराळ उद्योगाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, अंगीकार आणि त्याचा लाभ घेण्यात जगभरातील कंपन्यांना रुची असल्याचे या क्षेत्रातील प्रमुखांनी पंतप्रधानांना सांगितले. सरकारचे भक्कम पाठबळ आणि उद्योगांमधील सहकार्य यामुळे भारताच्या अंतराळ क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांना गती मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
२० स्टार्टअप्सचे प्रमुख सहभागी
या संवादात रॉकेट आणि पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण वाहने, एव्हिऑनिक्स, उपग्रह, प्रगत प्रणोदन प्रणाली, अंतराळ व संरक्षणविषयक गुप्तचर प्रणाली, अंतराळातील कचरा व्यवस्थापन तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हवामानविषयक प्रणाली अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या २० स्टार्टअप्सचे सीईओ आणि संस्थापक सहभागी झाले. स्कायरुट एरोस्पेस, अग्नीकुल कॉसमॉस, पिक्सेल, ध्रुव स्पेस, गॅलेक्सी आय, पीअरसाईट, बेलेट्रीक्स एरोस्पेस दिगंतरा यांसह विविध कंपन्यांच्या प्रमुखांचा त्यात समावेश होता.