

UAPA Terrorists List: देशविरोधी कारवायांवर आणखी कठोर भूमिका घेत केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्या (UAPA) अंतर्गत 23 संशयित व्यक्तींना अधिकृतपणे 'दहशतवादी' घोषित करण्यात आले आहे. हे सर्वजण पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (LeT), जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि इतर दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचा आरोप आहे.
गृह मंत्रालयाने याबाबत राजपत्र अधिसूचना जारी केली असून, या सर्वांची नावे UAPA च्या चौथ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. सरकारच्या माहितीनुसार, या व्यक्ती जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणणे, तरुणांची भरती करणे, शस्त्रांची तस्करी करणे आणि दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवणे अशा कामांमध्ये सक्रिय होते. सध्या यातील बहुतांश जण पाकिस्तान किंवा पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये वास्तव्यास असल्याचे सांगण्यात आले आहे.
या यादीत मसूद इलियास कश्मीरी, मोहम्मद मुसादिक, मुफ्ती मोहम्मद असगर खान, हाफिज अब्दुल शकूर, अब्दुल रऊफ, हाफिज खालिद, मौलाना सैफुल्लाह खालिद, मोहम्मद याकूब, मौलाना युसूफ तैयबी, ओवैस फारूज, राणा इफ्तिखार, वसीम नूर जाट, मोहम्मद शहीद फैसल यांच्यासह एकूण 23 जणांचा समावेश आहे.
गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, यादीतील काही संशयितांचा 2016 मधील नगरोटा लष्करी तळावरील दहशतवादी हल्ला आणि 2022 मधील जम्मूच्या सुंजवान भागातील सुरक्षा दलांवरील हल्ल्याशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सरकारने जारी केलेल्या यादीत अब्दुल रऊफ आणि हाफिज खालिद वलीद यांची नावेही आहेत. हे दोघे लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद यांचे निकटचे सहकारी असल्याचा आरोप गृह मंत्रालयाने केला आहे.
या यादीतील मोहम्मद शहीद फैसल उर्फ उस्ताद उर्फ जाकिर याचे कायमचे वास्तव्य बंगळुरू (कर्नाटक) येथे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, सध्या तो पाकिस्तानातील रावळपिंडी येथे राहत असल्याची माहिती सरकारने दिली आहे.
गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, त्याचे संबंध लष्कर-ए-तैयबा, अल-कायदा आणि ISIS शी संबंधित मॉड्यूलशी आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करणे, त्यांना शस्त्रांचे प्रशिक्षण मिळवून देणे आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे, असे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत.
गृह मंत्रालयाने स्पष्ट केले की, उपलब्ध पुरावे आणि गुप्तचर माहितीच्या आधारे या व्यक्ती दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे UAPA च्या कलम 35 अंतर्गत त्यांना अधिकृतपणे दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे संबंधित व्यक्तींविरोधात UAPA अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई अधिक सुलभ होणार असून, दहशतवादाविरोधातील कारवाईला आणखी बळ मिळणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.