

independence day 2026 red fort history british rule after 1857
पुढारी ऑनलाईन : लाल किल्ला, जो कधी मुघल सत्तेचे केंद्र होता. १८५७ च्या क्रांतीनंतर मुघलांचे शासन संपुष्टात आले आणि लाल किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यानंतर इंग्रजांनीही या किल्ल्याचा वापर आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी केला.
लाल किल्ल्याला पूर्वी ‘किल्ला-ए-मुबारक’ असे म्हटले जात असे. हा मुघल साम्राज्याच्या सत्तेचा केंद्रबिंदू होता. जवळपास दोन शतके मुघल बादशहांचे हे कायमस्वरूपी निवासस्थान होते. शाहजहानच्या काळापासून सप्टेंबर १८५७ पर्यंत लाल किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. त्यानंतर इंग्रजांनी लाल किल्ल्यावर कब्जा केला. चला जाणून घेऊया, इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर लाल किल्ल्याचा वापर कशासाठी करण्यात आला?
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने १८५७ चा पहिला स्वातंत्र्यसंग्राम दडपण्यासाठी लाल किल्ल्यावर हल्ला केला. मुगल बादशहा बहादुर शाह जफर यांना गादीवरून हटवण्यात आले. त्यावेळी किल्ल्याच्या परिसरात मोठी चकमक झाली. भारताच्या विविध भागांतून आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांविरोधात मोठी एकजूट दाखवली होती. मात्र, इंग्रजांनी हा उठाव दडपून टाकला.
एका वर्षाच्या आत ब्रिटिश राजवटीने ईस्ट इंडिया कंपनीची जागा घेतली. त्यानंतर हा भव्य किल्ला लष्करी छावणीत रूपांतरित करण्यात आला. किल्ल्याच्या आतील मोठ्या भागाची लूट करण्यात आली आणि तोडफोड करण्यात आली. ऐतिहासिक निवासी भागांचे सैनिकांच्या बराकींमध्ये रूपांतर करण्यात आले. ब्रिटिश राजवटीत किल्ल्याला अशा प्रकारे मजबूत करण्यात आले की तो त्यांच्या लष्करी सामर्थ्याचे प्रतीक बनला.
इंग्रजांनी लाल किल्ल्याचा कसा वापर केला?
बहादुर शाह जफर यांच्या कारकिर्दीच्या अखेरीस मुगल साम्राज्याचा अंत झाला. त्यानंतर इंग्रजांना किल्ल्यातील मौल्यवान वस्तू लुटण्याची संधी मिळाली. किल्ल्यातील जवळपास सर्व फर्निचर नष्ट करण्यात आले किंवा इंग्लंडला पाठवण्यात आले. किल्ल्यातील अनेक इमारती आणि ऐतिहासिक वास्तू पाडण्यात आल्या. त्यांच्या जागी दगडी बराकी बांधण्यात आल्या.
इंग्रजांनी लाल किल्ल्याचा वापर आर्मी बेस आणि मिलिटरी कोर्ट म्हणून केला. येथे ब्रिटिश सैनिक आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी राहत होते. अंतिम मुगल बादशहा बहादुर शाह जफर यांच्यावरही लाल किल्ल्यातच खटला चालवण्यात आला. १८५७ च्या उठावानंतर त्यांच्यावर लाल किल्ल्यातील दिवान-ए-खास येथे खटला चालवण्यात आला. त्यांना दोषी ठरवून बर्माला निर्वासित करण्यात आले.
इंग्रजांनी आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याबरोबरच या किल्ल्याचा वापर लष्करी अधिकाऱ्यांच्या सार्वजनिक कोर्ट-मार्शलसाठीही केला. हा किल्ला आतून आणि बाहेरून अनेक संकटांतून टिकून राहिला होता. नादिरशाहच्या हल्ल्यांनंतरही तो उभा राहिला होता. मात्र, इंग्रजांनी त्यावर कब्जा करून किल्ल्याचे मोठे नुकसान केले.
लाल किल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यांचे कोर्ट-मार्शल
भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीपर्यंत इंग्रज लाल किल्ल्यात सैनिक न्यायालये भरवत होते. बहादुर शाह जफर यांच्या खटल्यानंतरचा दुसरा प्रसिद्ध खटला १९४५-४६ मध्ये आझाद हिंद सेनेच्या (INA) अधिकाऱ्यांवर चालवण्यात आला. हा ऐतिहासिक लष्करी खटला ‘लाल किल्ला खटला’ म्हणून ओळखला जातो.
नोव्हेंबर १९४५ मध्ये लाल किल्ल्यात आझाद हिंद सेनेचे अधिकारी प्रेम सहगल, गुरबख्श सिंह ढिल्लों आणि शाहनवाज खान यांच्यावर ब्रिटिश सैन्याने कोर्ट-मार्शलचा खटला चालवला.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने लाल किल्ल्याच्या मोठ्या भागाचा ताबा घेतला. त्यानंतर किल्ला जीर्णोद्धारासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे (ASI) सोपवण्यात आला.