

Pahalgam Terror Attack Updates
दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यातील महत्त्वाची बैठक आज (दि.२८) झाली. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी झालेल्या ४० मिनिटांच्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर, पंतप्रधान मोदी भारत सरकारच्या पुढील पावलाबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात. तत्पूर्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सीडीएस अनिल चौहान यांच्याशी बैठक घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वीच दहशतवाद संपवण्याबद्दल बोलले आहे. रविवारच्या 'मन की बात' मध्येही त्यांनी पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडणार नाही, पीडितांना न्याय देणारच याचा पुनरुच्चार केला. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पीएम मोदींसोबत पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली.
पहलगाम हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सतत बैठका घेत आहेत. त्यांनी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याशी भेट घेतली. यानंतर, सीडीएस अनिल चौहान यांच्यासोबत एक बैठकही झाली. संरक्षणमंत्र्यांना भेटण्यापूर्वी, लष्करप्रमुखांनी पहलगामला भेट दिली होती आणि श्रीनगरमधील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या चौकीवर केलेल्या गोळीबार आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीबद्दल अपडेट्स घेतले होते. संरक्षण मंत्री सर्व उच्च अधिकाऱ्यांकडून अपडेट्स घेत आहेत आणि पंतप्रधानांसोबत बैठक घेत आहेत. अशा परिस्थितीत, एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.