

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत सलग बैठकांचे सत्र सुरू आहे. रविवारी संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे ४० मिनिटे चालली. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने हाय अलर्ट जारी केला आहे आणि अनेक शोध मोहिमा सुरू केल्या आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सीडीएस अनिल चौहान यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत जनरल चौहान यांनी संरक्षणमंत्र्यांना विविध ऑपरेशन्सबद्दल सविस्तर माहिती दिली आणि त्यांच्या काही धोरणांवर चर्चा केली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा सामना करण्यासाठी लष्कराने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचीही माहिती सीडीएस चौहान यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिल्याचे समजते.
हल्ल्यानंतर, राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकांनी २३ एप्रिलपासून पहलगाममधील घटनास्थळी पुरावे शोधण्याचे काम तीव्र केले आहे. एनआयएचे पोलिस महासंचालक, पोलिस उपमहासंचालक आणि पोलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी तपासात सहभागी आहेत. ते हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत.