

IIT gym death
रोपर: जिममध्ये व्यायाम करताना अचानक २१ वर्षीय बी.टेक विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील रूपनगर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) रोपरमध्ये समोर आली आहे. ही घटना ६ जानेवारी रोजी घडली.
मृत विद्यार्थ्याचे नाव आदित्य असे आहे. तो आयआयटी रोपरमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. तो मूळचा उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील रहिवासी होता. प्राथमिक माहितीनुसार, आदित्य जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक खाली कोसळला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पडण्यापूर्वी त्याच्या कानातून रक्त येत असल्याचे दिसले.
मृत्यूचे कारण काय?
घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि इतर विद्यार्थ्यांनी त्याला तातडीने रुग्णवाहिकेने आयआयटीच्या मेडिकल सेंटरमध्ये नेले, तिथून त्याला पुढील उपचारासाठी रूपनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रूपनगर सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सनी खन्ना यांनी या घटनेची माहिती दिली असून, डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार ब्रेन हॅमरेज हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित सर्व तपास केला जात आहे. यामध्ये विद्यार्थ्याची अलीकडील आरोग्य स्थिती आणि तो जिममध्ये करत असलेल्या व्यायामाचाही समावेश आहे. मेडिकल-लीगल रिपोर्टच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. आयआयटी रोपर प्रशासनाने विद्यार्थ्याच्या अकाली निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. संस्थेने जारी केलेल्या निवेदनात आदित्य हा एक हुशार विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे. प्रशासनाने मृताच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली असून, या घटनेमुळे मानसिक धक्क्यात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.