

केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
'एअर इंडिया' नंतरचा देशातील सर्वात मोठा धोरणात्मक निर्गुतवणूक व्यवहार
बँकिंग क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीचा नवा विक्रम
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत बुधवारी आयडीबीआय बँकेतील ६०.७२ टक्के हिस्सा 'फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स'ला विकण्यास मंजुरी देण्यात आली. हा संपूर्ण व्यवहार ५२,८७८ कोटी रुपयांना होणार असून 'एअर इंडिया'च्या विक्रीनंतरचा हा देशातील सर्वात मोठा धोरणात्मक निर्गुतवणूक करार ठरला आहे आयुर्विमा महामंडळ मिळून बँकेतील आपला ६०.७२ टक्के हिस्सा फेअरफॅक्स समूहाला हस्तांतरित करणार आहेत.
यामध्ये केंद्र सरकारचा ३०.४८ टक्के, तर एलआयसीचा ३०.२४ टक्के वाटा समाविष्ट आहे. गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे आता आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय नियंत्रण पूर्णपणे 'फेअरफॅक्स'कडे सोपवले जाईल.
आर्थिक क्षेत्रातील मोठी परकीय गुंतवणूक
केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली. या पुनर्रचनेनंतर केंद्र सरकार आणि एलआयसीकडे मिळून ३४ टक्के हिस्सा शिल्लक राहील. सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीय क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक ठरणार आहे.
नियामक अटी आणि पूर्ततेची अंतिम मुदत
'दीपम'चे सचिव अरुणीश चावला यांच्या माहितीनुसार, हा व्यवहार चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या करारांतर्गत 'फेअरफॅक्स'ला अल्पसंख्याक भागधारकांसाठी खुली ऑफर आणावी लागेल. याव्यतिरिक्त, 'फेअरफॅक्स'ची सध्या सीएसबी बँकेतही भागीदारी असल्याने, त्यांना पुढील दोन वर्षांच्या आत सीएसबी बँकेचे आयडीबीआय बँकेत विलीनीकरण करावे लागेल किंवा त्यातील आपली हिस्सेदारी विकावी लागेल. या मंजुरीमुळे थेट परकीय गुंतवणुकीचा नवा विक्रम घडला आहे.
ऐतिहासिक व्यवहार : फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स आयडीबीआय बँकेतील ६०.७२ टक्के हिस्सा ५२,८७८ कोटी रुपयांना खरेदी करणार आहे.
सर्वात मोठी गुंतवणूक : हा व्यवहार पूर्ण झाल्यावर देशाच्या वित्तीय क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा थेट परकीय गुंतवणूक करार ठरेल.
सरकारी भागीदारी : या विक्री करारानंतरही केंद्र सरकार आणि एलआयसी मिळून बँकेत ३४ टक्के हिस्सा कायम ठेवणार आहेत.
द्विवार्षिक मुदत : 'फेअरफॅक्स'ला खुल्या ऑफरसह आपल्या सीएसबी बँकेतील गुंतवणुकीचे विलीनीकरण अथवा निर्गमन दोन वर्षांत पूर्ण करावे लागेल