

IAS Prakash Rajpurohit New Deputy Election Commissioner
नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारतीय निवडणूक आयोगात (ECI) मोठा प्रशासकीय फेरबदल करत २०१० च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी प्रकाश राजपुरोहित यांची नवे उप निवडणूक आयुक्त (DEC) म्हणून नियुक्ती केली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) या महत्त्वाच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवला आहे.
कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (DoPT) जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, राजस्थान संवर्गाचे (कॅडर) सनदी अधिकारी असलेल्या प्रकाश राजपुरोहित यांच्याकडे एप्रिल २०३० पर्यंत उप निवडणूक आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ते यापूर्वी मे २०२६ पासून संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागात सहसचिव पदावर कार्यरत होते. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अलीकडेच मंजूर केलेल्या २७ सहसचिव व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या व्यापक फेरबदलाचाच हा एक भाग आहे.
निवडणूक आयोगातील हे मोक्याचे पद गेल्या ऑगस्ट महिन्यापासून रिक्त होते. मतदार यादी आणि माहिती तंत्रज्ञान (IT) विभागाचे तत्कालीन प्रभारी उप निवडणूक आयुक्त संजय कुमार यांची ऑगस्ट महिन्यात मुदतीपूर्वीच त्यांच्या मूळ संवर्गात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती दिल्ली सरकारमध्ये करण्यात आली. विशेष म्हणजे, २४ जून २०२५ रोजी देशभरात ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया सुरू करण्याबाबत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या महत्त्वाच्या आदेशावर संजय कुमार यांचीच स्वाक्षरी होती.
दरम्यान, एका वृत्तानुसार, निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कामकाजावरून आयोगामध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले होते. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी अंतर्गत चर्चेदरम्यान या विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवले होते. यामध्ये जुलै महिन्यात संजय कुमार यांच्याकडून माहिती तंत्रज्ञान विभागाचा कार्यभार काढून घेण्याच्या निर्णयाचाही समावेश होता. अशा संवेदनशील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रकाश राजपुरोहित यांच्याकडे ही महत्त्वपूर्ण सूत्रे सोपवण्यात आली आहेत.