

Abhijit Deepke released on bail : दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर जामिनावर सुटका झाल्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके आज (दि. ११) आपल्या मूळ गावी रवाना झाले आहेत. “दुपारी २ वाजता होणारी पत्रकार परिषद आता सौरव दास आणि आशुतोष रांका घेतील,” असे त्यांनी स्पष्ट केले. दीपके यांच्या आजीचे शनिवारी निधन झाले असून त्यांच्यावर अद्याप अंत्यसंस्कार झालेले नाहीत. आजीच्या अंतिम दर्शनासाठी ते महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील आपल्या गावी निघाले आहेत.
अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका हे तिघे शनिवारी सकाळी मुंबईहून एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीत पोहोचले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांना विमानातच ताब्यात घेतले. त्यानंतर तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. रविवारी या तिघांना दिल्ली कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यात विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. तिथे प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली.
गावी रवाना होण्यापूर्वी प्रतिक्रिया देताना अभिजित दीपके म्हणाले, “देशातील हुकूमशाहीच्या अंताची ही तर सुरुवात आहे आणि १० ऑक्टोबरचा हा दिवस कायम लक्षात ठेवला जाईल.”दरम्यान, पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “सुमारे २४ तास बेकायदेशीररीत्या स्थानबद्धतेत ठेवल्यानंतर कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने कॉकरोच जनता पार्टीच्या (कॉजपा) तिन्ही नेत्यांची सुटका केली आहे.” मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत पोलिसांनी केलेल्या या मनमानी कारवाईवर चौफेर टीका होत असून याविरोधात कायदेशीर लढा दिला जात असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले.
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रविवारीही कनॉट प्लेस भागात डाव्या संघटनांचे कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने एकत्र आले असून दिल्ली पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत.