IAF Chief AP Singh | पाकिस्तानची 5 लढाऊ विमाने, एक टेहळणी विमान उद्धवस्त केले; हवाई दल प्रमुखांचा मोठा खुलासा
IAF Chief AP Singh on Operation Sindoor
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाने (IAF) मे महिन्याच्या सुरुवातीला राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानला जबर लष्करी हादरा दिल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी शनिवारी बंगळूरु येथे एका व्याख्यानात बोलताना खुलासा केला की, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानची 5 लढाऊ विमाने आणि एक विशेष टेहळणी विमान (AEW&C/ELINT) नष्ट केले आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानच्या हवाई सामर्थ्याला मोठा धक्का बसला आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 7 ते 10 मे दरम्यान 'ऑपरेशन सिंदूर' राबवले होते. या कारवाईत पाकिस्तानचे नेमके किती नुकसान झाले, याचा तपशील पहिल्यांदाच अधिकृतपणे समोर आला आहे.
काय म्हणाले हवाई दल प्रमुख?
एअर चीफ मार्शल एल.एम. कटरे स्मृती व्याख्यानात बोलताना ए.पी. सिंग यांनी या ऑपरेशनची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "भारताच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीने पाकिस्तानची एकूण 6 विमाने पाडली.
यामध्ये जेकबाबाद हवाई तळावर उभी असलेली काही F-16 लढाऊ विमाने आणि भोलारी येथील एक AEW&C विमानाचा समावेश आहे."
AEW&C (Airborne Early Warning and Control) हे एक विशेष लष्करी विमान आहे, जे हवाई टेहळणी आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवून पूर्वसूचना देण्याचे काम करते. हवाई दल प्रमुखांच्या मते, हे विमान तब्बल 300 किलोमीटर अंतरावरून अचूकतेने पाडण्यात आले.
या कारवाईतील नुकसानीची पुष्टी सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या छायाचित्रांवरून करण्यात आली आहे.
बालाकोटच्या अनुभवातून शिकलो - हवाई दल प्रमुख
हवाई दल प्रमुखांनी बालाकोट एअर स्ट्राइकच्या अनुभवाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, "बालाकोटमध्ये आपण मोठे यश मिळवले होते, पण तेथील नुकसानीचे ठोस पुरावे सादर करता न आल्याने आपल्याच देशातील लोकांना यश पटवून देताना अडचणी आल्या.
तिथे मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेल्याची गुप्त माहिती आमच्याकडे होती, पण आम्ही ते सिद्ध करू शकलो नाही. मात्र, 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आम्ही ही उणीव भरून काढली आणि आपण काय साध्य केले आहे, हे जगाला दाखवून दिले. याचा मला आनंद आहे."
ऑपरेशनच्या यशामागील कारणे
एअर चीफ मार्शल सिंग यांनी या ऑपरेशनच्या यशाचे श्रेय कणखर राजकीय इच्छाशक्तीला दिले. ते म्हणाले की, यावेळी लष्कराला स्पष्ट निर्देश देण्यात आले होते आणि कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादण्यात आले नव्हते.
लक्ष्यांची अचूक निवड: यावेळी केवळ दहशतवाद्यांचे लॉन्चपॅडच नव्हे, तर दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना आणि त्यांच्या मुख्यालयांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बहावलपूर आणि मुरिदके येथील दहशतवादी मुख्यालयांवर हल्ले करण्यात आले.
विविध यंत्रणांचा समन्वय: या ऑपरेशनमध्ये तिन्ही सैन्यदलांसह एकूण ८ विविध सुरक्षा यंत्रणांचा सहभाग होता आणि सर्वांमध्ये उत्तम समन्वय होता.
S-400 प्रणाली ठरली 'गेम चेंजर': हवाई दल प्रमुखांनी नुकत्याच खरेदी केलेल्या S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, "S-400 प्रणाली या युद्धात 'गेम चेंजर' ठरली. तिच्या प्रचंड मारक क्षमतेमुळे पाकिस्तानी विमाने भारतीय हद्दीपासून दूर राहिली आणि लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बसारख्या शस्त्रांचा वापर करू शकली नाहीत."
युद्ध सुरु ठेवले तर अधिक किंमत मोजावी लागते...
10 मे रोजी पाकिस्तानी डीजीएमओने (Director General of Military Operations) युद्धबंदीसाठी संपर्क साधल्यानंतर भारताने तो स्वीकारला. या निर्णयाचे समर्थन करताना हवाई दल प्रमुख म्हणाले, "आपला उद्देश दहशतवाद्यांना धडा शिकवणे हा होता.
आपण सतत युद्ध स्थितीत राहू शकत नाही. 80 ते 90 तासांच्या कारवाईत आपण पाकिस्तानचे इतके नुकसान केले की, युद्ध सुरू ठेवल्यास त्यांना अधिक किंमत मोजावी लागेल हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनीच चर्चेचा प्रस्ताव दिला.
काही जवळच्या लोकांनी 'अजून मारायला हवे होते' असे म्हटले, पण देशाने घेतलेला युद्धबंदीचा निर्णय योग्य होता."

