

Hyderabad family car accident USA
हैदराबाद : अमेरिकेत सुट्टीसाठी गेलेल्या हैदराबादच्या एका कुटुंबाचा भीषण अपघातात होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कार अपघातात पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. हे कुटुंब अटलांटा येथून डलासकडे परत येत असताना ही दुर्घटना घडली.
हैदराबाद येथील तेजस्विनी, श्री वेंकट आणि त्यांची दोन मुले डॅलसमध्ये सुट्टीसाठी गेले होते. अटलांटामधील नातेवाईकांना भेटून परतताना ग्रीन काउंटी भागात सोमवारी रात्री उशिरा त्यांच्या कारचा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चुकीच्या दिशेने येत होता. समोरासमोर झालेल्या या धडकेनंतर कारला आग लागली आणि संपूर्ण कुटुंब त्यात होरपळले. आग इतकी भयंकर होती की चौघांचाही जागीच मृत्यू झाला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली.
स्थानिक पोलिसांनी मृतदेह फॉरेंसिक तपासणीसाठी पाठवले आहेत. डीएनए चाचणीच्या आधारे मृतांची ओळख पटवून नातेवाईकांना मृतदेह सोपवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एका दुसऱ्या घटनेत, न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात क्लीव्हलँड स्टेट युनिव्हर्सिटीच्या दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती भारतीय दूतावासाने मंगळवारी दिली. पीटीआयच्या वृत्तानुसार, मानव पटेल (वय २०) आणि सौरव प्रभाकर (वय २३) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. १० मे रोजी ईस्ट कोकालिका टाऊनशिपमध्ये हा अपघात झाला होता, तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अपघात झाला तेव्हा प्रभाकर गाडी चालवत होता. या अपघातात प्रभाकर आणि पटेल यांचा जागीच मृत्यू झाला, तर पुढच्या सीटवर बसलेला आणखी एक प्रवासी जखमी झाला होता, त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे वाहन रस्त्यावरून घसरून एका झाडाला आणि नंतर पुलाला धडकताना दिसत होते. "क्लीव्हलँड स्टेट युनिव्हर्सिटीचे दोन भारतीय विद्यार्थी, मानव पटेल आणि सौरव प्रभाकर, यांचा एका दुर्दैवी रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे समजून आम्हाला खूप दुःख झाले आहे," असे भारतीय दूतावासाने 'X' वर पोस्ट केले आहे.