

नवी दिल्ली : भारताच्या हवाई दलासाठी तेजस विमानांची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ला त्यांचे चौथे इंजिन मिळाले आहे. हे इंजिन अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक (जीई) ने सुपूर्द केले. भारतीय हवाई दलाला नोव्हेंबरपर्यंत दोन तेजस मार्क-१ए लढाऊ विमाने मिळणार आहेत. त्यामध्ये या इंजिनचा समावेश केला जाणार आहे.
यापूर्वी ११ सप्टेंबर रोजी तिसरे जीई-४०४ इंजिन अमेरिकन कंपनीकडून मिळाले होते. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला अमेरिकन कंपनीकडून एकूण बारा ‘जीई-४०४’ इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, फेब्रुवारी २०२१ मध्ये, सरकारने ८३ तेजस मार्क-१ए विमाने खरेदी करण्यासाठी एचएएल सोबत ४८,००० कोटी रुपयांचा करार केला, परंतु अमेरिकन इंजिनांच्या वितरणात विलंब झाल्यामुळे एचएएलने अद्याप एकही विमान दिलेले नाही. एचएएल २०२८ पर्यंत सर्व विमाने हवाई दलाला देण्याची अपेक्षा आहे.
एलसीए मार्क १ए हे तेजस विमानाचे प्रगत रूप आहे. त्यात अद्ययावत रडार प्रणाली आहे. एलसीए मार्क १ए चे ६५% पेक्षा जास्त घटक भारतात तयार केले जातात. एचएएलने विकसित केलेले तेजस हे एकल-इंजिन हलके लढाऊ विमान आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने २५ सप्टेंबर रोजी एचएएलला भारतीय हवाई दलासाठी अतिरिक्त ९७ मार्क-१ए हलके लढाऊ विमान (तेजस लढाऊ विमाने) तयार करण्याचे कंत्राट दिले. केंद्र सरकारने एचएएलसोबत ६२,३७० कोटी रुपयांचा करार केला. मार्क-१ए विमान हवाई दलाच्या मिग-२१ ताफ्याची जागा घेईल. पाकिस्तान सीमेजवळील राजस्थानमधील बिकानेर येथील नल हवाई तळावर ते तैनात करण्याचे नियोजन आहे.