

Aadhaar Card Update New Charges : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी ते अनिवार्य आहे. हे कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केले जाते. आधार कार्डशी संबंधित कोणतेही अपडेट 'युआयडीएआय'च्या माध्यमातूनच केले जाते. १ ऑक्टोबरपासून आधार अपडेटसाठी नवीन शुल्क लागू केले आहे. जाणून घेवूया आधार कार्ड अपडेटच्या याच नवीन शुल्कांबाबत...
UIDAI च्या नियमांनुसार, नवीन आधार कार्ड बनवणे हे सर्वांसाठी विनामूल्य (मोफत) आहे. नागरिक त्यांच्या जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन आपले आधार कार्ड बनवू शकतात.
बायोमेट्रिक अपडेटसाठी किती पैसे माेजावे लागणार UIDAI ने १ ऑक्टोबरपासून आधार अपडेटसाठी नवीन शुल्क लागू केले आहेत. या नवीन बदलांनुसार, बायोमेट्रिक अपडेट (उदा. फिंगरप्रिंट, डोळ्यांची आयरीस किंवा फोटो बदलणे) करण्यासाठी नागरिकांना १२५ रुपये शुल्क भरावे लागेल. ७ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या बायोमेट्रिक अपडेटसाठीही १२५ रुपये शुल्क आकारले जाईल. ३० सप्टेंबरपर्यंत हे अपडेट मोफत होते.
आधार कार्डमधील डेमोग्राफिक अपडेट्स (उदा. नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस अपडेट करणे) यासाठी ७५ रुपये शुल्क आकारले जाईल. मात्र, हे अपडेट बायोमेट्रिक अपडेटसोबत केले तर ते मोफत असेल. तुम्ही हे अपडेट ऑनलाईन केले, तर ते विनामूल्य असेल, परंतु आधार केंद्रावर यासाठी तुम्हाला ७५ रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
५ ते ७ वर्षे आणि १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट जर पहिल्यांदा केले जात असेल, तर ते आता मोफत आहे. तथापि, दुसऱ्या वेळेस बायोमेट्रिक अपडेटसाठी १२५ रुपये शुल्क द्यावे लागेल.
UIDAI ने १० वर्षे किंवा त्याहून अधिक जुने असलेले आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे, जर तुमचे आधार कार्ड १० वर्षांपासून अपडेट झाले नसेल, तर ते त्वरित अपडेट करून घेणे अनिवार्य आहे.