

Himachal Pradesh Bus Accident
चंबा: हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात बैरागढ-चंबा मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. एक खासगी बस बैरागढहून चंबाकडे जात असताना, देविकोठीजवळील चालुज वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून खाली कोसळली आणि थेट १०० फूट खाली असलेल्या दुसऱ्या रस्त्यावर जाऊन पडली.
प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातात बसचालक आणि वाहकासह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, जखमींपैकी सुमारे सात प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
'शर्मा ट्रॅव्हल्स'ची बस आज सकाळी साडेसहाच्या सुमारास बैरागढहून चंबाकडे निघाली होती. अवघे तीन किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर, चालुज वळणाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खाली कोसळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे २० ते २५ प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत व बचावकार्य सुरू केले. ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनंतर अपघातग्रस्त बसमधून जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी तिस्सा येथील रूग्णालयात दाखल केले.
सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू असून बस सरळ करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बसच्याखाली आणखी काही प्रवासी अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चंबाचे पोलीस अधीक्षक विजय सकलानी यांनी सांगितले की, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही आणि पोलीस या घटनेशी संबंधित परिस्थितीचा तपास करत आहेत.