Arunachal Pradesh: चीनला चोख प्रत्युत्तर; अरुणाचलमधील २७ ठिकाणांना भारताच्या नकाशात अधिकृत नावे

भारतीय सर्वेक्षण विभागाच्या अद्ययावत नकाशात अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणांना अधिकृत नावे देण्यात आली आहेत.
Arunachal Pradesh
Arunachal PradeshFile Photo
Published on
Updated on

Arunachal Pradesh

गुवाहाटी: चीनकडून अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची वारंवार नावे बदलण्याच्या प्रयत्नांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सर्वेक्षण विभागाच्या अद्ययावत नकाशात अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणांना अधिकृत नावे देण्यात आली आहेत. यामध्ये चार पर्वतीय खिंडी आणि एका उंचावरील सरोवराचाही समावेश आहे. भारत-चीन सीमेबाबत कोणताही संभ्रम राहू नये आणि प्रदेशाच्या सीमांकनाबाबतची स्थिती स्पष्ट राहावी, हा या निर्णयामागील उद्देश आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, या ठिकाणांची नावे अरुणाचल प्रदेश सरकारशी सल्लामसलत करून निश्चित करण्यात आली आहेत. भारतीय सर्वेक्षण विभागाच्या नकाशावर ही ठिकाणे अधिकृतपणे दाखवण्यात आल्याने त्यांची अचूक ओळख पटण्यास आणि नागरिकांमध्ये त्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.

Arunachal Pradesh
PM Narendra Modi | भिऊ नका, मी तुमच्‍या पाठीशी!

सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या गावांचा समावेश

नकाशात समाविष्ट करण्यात आलेल्या २७ ठिकाणांपैकी एक ठिकाण स्मारक आहे. तर लोंगजू, माजा आणि बिसा ही तीन ठिकाणे अपर सुबनसिरी जिल्ह्यातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाची सीमावर्ती गावे आहेत. याच जिल्ह्यात मॅकमोहन रेषेवर असलेल्या ड्झो ला, रिझा ला आणि पुकूर ला या तीन खिंडींचाही समावेश करण्यात आला आहे. तर तवांग जिल्ह्यातील थाग ला खिंड ही १९६२ च्या भारत-चीन युद्धातील महत्त्वाची रणभूमी होती.

“ही ठिकाणे भारतीय लष्कराच्या नकाशांवर आधीपासूनच आहेत. १९६२ सालच्या जुन्या लष्करी नकाशांमध्येही त्यांचा उल्लेख आहे. आता त्यांना भारतीय सर्वेक्षण विभागाच्या नकाशावर अधिकृतपणे स्थान देणे हे चीनच्या दाव्यांना ठोस प्रत्युत्तर आहे,” असे एका सूत्राने सांगितले.

१९६२च्या युद्धाशी संबंधित ठिकाणे

या यादीतील अनेक ठिकाणांना भारत-चीन संघर्षाच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे. लोंगजू हे भारत-चीन सीमा विवादातील सुरुवातीच्या संघर्षस्थळांपैकी एक असून, १९५९ मध्ये चिनी सैन्याने या भागावर ताबा मिळवला होता. थाग ला खिंड ही नमका चू खोऱ्यावर नजर ठेवणाऱ्या भागात आहे. १९६२ मध्ये चिनी सैन्याने मॅकमोहन रेषा ओलांडल्यानंतर याच परिसरातून युद्धाला सुरुवात झाली होती.

तवांगमधील जसवंत गढ हे १९६२ च्या युद्धातील शूर सैनिक रायफलमन जसवंत सिंह रावत यांच्या स्मृतीला समर्पित आहे. तर अपर सुबनसिरीमधील शेर-ए-थापा स्मारक हवालदार शेर थापा यांच्या शौर्याची आठवण करून देते. १९६२ मध्ये रिओ पुलाजवळ त्यांनी केलेल्या प्रतिकारामुळे चिनी सैन्याला काही काळ रोखले होते. या यादीतील एकमेव सरोवर म्हणजे सांभो सरोवर. हे समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर असलेले हिमनदीजन्य सरोवर आहे.

कोणत्या जिल्ह्यांतील ठिकाणांचा समावेश?

अंजॉ जिल्ह्यात बारा कुंदून, छोटा कुंदून आणि धन बारी या ठिकाणांचा समावेश आहे. चांगलांग जिल्ह्यात प्रीतनगर, बुद्धमंदिर, जयरामपूर, तेरीतनगर आणि रामनगर यांना नकाशावर स्थान देण्यात आले आहे. पश्चिम कामेंग जिल्ह्यात सागर, पद्मा, ज्योतिनगर आणि बैसाखी, तर अपर सुबनसिरीमध्ये छोटा रोपुक आणि बारा रोपुक यांचा समावेश आहे. लोहित जिल्ह्यात शिवाजीनगर, सुनपुरा आणि कामलांगनगर ही ठिकाणे अधिकृत नकाशात समाविष्ट करण्यात आली आहेत.

चीनकडून यापूर्वीही नामकरणाचे प्रयत्न

दरम्यान, एप्रिलमध्ये चीनने अरुणाचल प्रदेशातील २३ ठिकाणांना चिनी नावे देण्याची घोषणा केली होती. चीन अरुणाचल प्रदेशला ‘दक्षिण तिबेट’ असे संबोधतो. त्यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या या कृतीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, “काल्पनिक नावे दिल्याने वास्तव बदलणार नाही,” असे स्पष्ट केले होते. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अभिन्न भाग होता, आहे आणि कायम राहील, असेही भारताने ठामपणे सांगितले होते.

चीनकडून अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांचे नामकरण करण्याचे प्रयत्न यापूर्वीही अनेकदा करण्यात आले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने आता अधिकृत नकाशावर या महत्त्वाच्या ठिकाणांची प्रमाणित नावे नोंदवली आहेत. मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीनमधील पूर्वेकडील सीमारेषा निश्चित करते. ही रेषा अरुणाचल प्रदेश आणि तिबेट यांना वेगळे करते.

Arunachal Pradesh
Jammu Kashmir News: गोळ्या झाडूनही स्कॉर्पिओ थांबली नाही...; जम्मू-श्रीनगर हायवेवर सुरक्षा यंत्रणांची धावपळ; हाय अलर्ट जारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news