

Kedarnath helicopter crash : केदारनाथ धामहून गुप्तकाशीला जाणारे हेलिकॉप्टर रविवारी पहाटे गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. यात पायलटसह ७ जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर, चार धाम प्रदेशात चालणाऱ्या हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्यात आल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले. ही दुर्घटना गौरीकुंड परिसरात घडली. सकाळी ५.३० वाजता ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी हेलिकॉप्टर कोसळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. गौरीकुंडच्या वर गवत कापत असलेल्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती दिली.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हेलिकॉप्टर अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी, उत्तरकाशी जिल्ह्यात ८ मे रोजी सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस-प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले. गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानीजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ, अग्निशमन दल, वैद्यकीय पथक आणि इतर आपत्कालीन मदत पथके घटनास्थळी पोहोचली होती. हे हेलिकॉप्टर एअरोट्रान्स कंपनीचे होते, ज्याने ८ मे रोजी सकाळी सहस्त्रधारा हेलिपॅडवरून हर्षिलसाठी उड्डाण केले होते. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सात जण होते, त्यापैकी सहा प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एक प्रवासी जखमी झाला होता. हेलिकॉप्टरमधील चार प्रवासी मुंबईचे तर दोन आंध्र प्रदेशचे होते.