

Hantavirus
नवी दिल्ली: स्पेनमधील कॅनरी बेटांजवळ 'हंता व्हायरस'च्या भीतीमुळे अडकून पडलेल्या 'एमव्ही होंडियस' या डच जहाजावरील दोन भारतीय खलाशी पूर्णपणे सुखरूप आहेत. या दोन्ही भारतीयांमध्ये व्हायरसची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नसून, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना नेदरलँडमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. माद्रिद येथील भारतीय दूतावासाने रविवारी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली.
सुमारे १५० प्रवासी आणि कर्मचारी असलेल्या 'एमव्ही होंडियस' या जहाजावर हंता व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर हे जहाज स्पेनच्या किनारपट्टीवर नांगरून ठेवण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटना आणि स्पेनमधील आरोग्य प्रशासनाने निश्चित केलेल्या प्रोटोकॉलनुसार, जहाजावरील प्रवाशांना उतरण्याची परवानगी देण्यात आली. यामध्ये काम करणाऱ्या दोन भारतीय कर्मचाऱ्यांना तातडीने नेदरलँडमध्ये हलवण्यात आले असून, तिथे त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे.
१० मे रोजी जारी केलेल्या निवेदनात भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, "दोन्ही भारतीय नागरिक पूर्णपणे निरोगी असून त्यांच्यात आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत. भारतीय प्रशासन सातत्याने स्पॅनिश अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, भारतीयांच्या सुरक्षिततेची सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे."
हंता व्हायरस हा प्रामुख्याने उंदीर आणि घुशींमार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये, या विषाणूमुळे श्वसनाचे गंभीर आजार उद्भवू शकतात. युरोपमधील आरोग्य यंत्रणांनी या जहाजाबाबत कडक पावले उचलल्याने जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तज्ज्ञांच्या मते सध्या तरी भारतासाठी या विषाणूचा कोणताही धोका नाही.